जर हे होणारे असते तर मी सांगितले असते हे होणार आहे. मनोज जरांगे पाटील जेव्हा मुंबईला निघाले होते तेव्हा मी सांगितले होते मुख्यमंत्री तोंडाला पाने पुसतील आणि पाठवून देतील. काय झाले? मी जरांगे पाटील यांना फोन करणार आहे, त्यांची भेट घेणार आहे, असे राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना स्पष्ट केले.
भुजबळ बोलतात, ओबीसी बोलतात यातून माथी भडकविली जातील. यातून हाती काही लागणार नाहीय. मला जरांगेंशी बोलणार त्यांना काय ते सांगणार. मला जातपात कळत नाही. माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे. मला या गोष्टी जरांगेंशी बोलू द्या, तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका, असे भुमिका स्पष्ट करा अशी मागणी करणाऱ्या मराठा आंदोलकांना राज यांनी सांगितले.
राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी धाराशीवमधील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. यावेळी रात्री मराठा आंदोलक या हॉटेलमध्ये जमा झाले आणि त्यांनी मराठा आरक्षणावर तुमची भुमिका काय अशी विचारणा केली. राज ठाकरे यांनी सोलापूर येथे केलेल्या मराठा आरक्षण विषयी वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली. महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात आल्यानंतर कुठल्याही समाजाला आरक्षणाची गरज भासणार नाही, असे माझे मत असल्याचे राज म्हणाले. मराठा आरक्षणाविषयी माझी काय भूमिका आहे. हे मी तुम्हाला मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सांगेन, असे ठाकरे म्हणाले. तसेच जालन्याला दौऱ्यावेळी मी जरांगे यांची भेट घेईन असे आश्वासन राज यांनी आंदोलकांना दिले.
यावेळी मराठा आंदोलकांनी जरांगे मंगळवारी तुळजापूरला मुक्कामी असणार आहेत असे सांगितले. यावर राज ठाकरे यांनी जरांगे यांचा नंबर मागितला व त्यांच्याशी बोलतो असे आश्वासन दिले.