उस्मानाबाद : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे. आज बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे.
कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून जे काही झाले, ते चुकीचे आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार काही करत नाही. महाराष्ट्र व कर्नाटक अशी झुंज लावण्याचे काम भाजप करत आहे, हे सगळं ठरवून सुरू आहे. राजकीय अस्थिर करुन बेरोजगार, उद्योग महाराष्ट्र बाहेर पाठविण्यासाठी हे सगळं सुरु आहे, असे सांगत सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकार व भाजपवर निशाणा साधला.
भाजप सरकार दोन्हीकडे आहे, त्यांना जाब विचारला पाहिजे. वेळ पडली तर शिवसेनेचा प्रत्येक शिलेदार बेळगावात जाईल. तसेच, 17 तारखेला महाविकास आघाडी मुंबईत महामोर्चा काढणार आहे. याबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, 17 तारखेला महाविकास आघाडी अरेरावी चालू देणार नाही. दिल्लीसमोर झुकणार नाही.
याचबरोबर, एकीकडे सुषमा अंधारे यांची भीती नाही म्हणतात आणि भाजप मंत्री माझ्यावर रोज बोलतात. सभेत माझ्या विरोधात काही बोलले तरी मला ते अडकवू शकत नाहीत, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. दरम्यान, गेल्या काही दिवसांत सीमाभागात घडलेल्या काही घडामोडी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे