मुंबई : चारचाकी आणि छोट्या वाहनांना टोल नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तेव्हा आमची माणसे प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील. या वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही. याला विरोध करायचा प्रयत्न केला तर टोलनाके जाळून टाकू, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दिला.
शिवतीर्थ निवासस्थानी पत्रकार परिषद घेत टोलनाक्याविषयीची राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. मनसेने टोलविरोधात आंदोलन छेडल्यापासून प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांच्या टोलमाफीचे व्हिडिओच दाखविले. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चित्रफिती होत्या. सगळ्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू, अशी आश्वासने दिली. पण तरीही टोल बंद होत नाहीत. मधल्या काळात यांची सगळ्यांची सरकारे येऊन गेली पण आजपर्यंत टोल बंद झालेले नाहीत.
राजकारणातल्या अनेक लोकांचे हे उदरनिर्वाहाचे साधन आहे. दर दिवसाला, आठवड्याला, महिन्याला यांच्याकडे यातून पैसे जात असतात. ते यामुळे टोल बंद करायला तयार नाहीत. तुम्हाला चांगले रस्ते मिळणार नाहीत. फक्त याच लोकांचा फायदा होणार आहे. या लोकांनी थापा मारल्यानंतरही पुन्हा त्याच पक्षाला मतदान होते हेच माझ्यासाठी अनाकलनीय आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार- देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना फक्त कमर्शियल गाड्यांनाच टोल आकारणी होत असल्याचे विधान केले होते. त्यावर, हे धादांत खोटे असल्याचे राज म्हणाले. - जर टोलमुक्ती झाल्यानंतरही आपण टोल देत असू, तर हे पैसे जातायत कुठे, टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. याबाबत मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यांचे काय उत्तर येते ते बघू. अन्यथा फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे संबंधित वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही. पुढे महाराष्ट्र सरकारला काय करायचे ते करावे, असा इशारा त्यांनी दिला.
मनसैनिकांवरील खटले मागे घ्या! आमच्या लोकांनी याच गोष्टींसाठी आंदोलने केली. मनसैनिकांनी केसेस अंगावर घेतल्या. वर हे सांगतायत असे काही नाही. मग त्या केसेस काढून टाका, असेही ते म्हणाले.
आंदोलनामुळे ६७ टोलनाके बंदआमच्या आंदोलनाच्या रेट्यानंतर अधिकृत आणि अनधिकृत असे ६७ टोल नाके बंद झाले. अन्यथा कुठल्याच सरकारच्या मनात टोल बंद करायची इच्छा नव्हती. पण, आमचा रेटा इतका होता की टोल बंद करावेच लागले. सरकार टोल नाही म्हणत असतानाही वसुली होत असेल तर या टोलवाल्यांवर सरकारची भीती असणार आहे की आमची दाखवू, असेही ते म्हणाले.