मुंबई - योगायोगाने भेटी होतात. राजकीय काही होत नाही. उद्धव ठाकरे आणि भाजपा एकत्र येणार नाही. जर झाले तर त्याला कुणी काही करू शकत नाही. मविआचे ३१ उमेदवार निवडून आलेत. अजित पवार-एकनाथ शिंदे यांना बाजूला करून भाजपाला कदाचित उद्धव ठाकरेंना जवळ करायचे असेल हे दिसतंय. जर उबाठा भाजपासोबत गेले तर त्याचा प्रचंड रोष विधानसभेत दिसेल. मात्र असं काही होईल वाटत नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे.
आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की, ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. मुख्यमंत्री कोण ते वरिष्ठ नेते चर्चा करून ठरवतील. उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत जायचं ठरवलं तर त्यांचा अजित पवार होईल. जे दिसतं ते बोलतो. आम्हाला भीती वैगेरे काही नाही. उद्धव ठाकरे-शरद पवार दोघेही सोडून गेले तरी महाराष्ट्राची सहानुभूती आमच्यासोबत येणार आहे असं त्यांनी म्हटलं. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच महाराष्ट्राचं राजकारण लाटेवर चालणारं आहे. सहानुभूतीवर चालते, ते लोकसभेला पाहिले. शरद पवारांचे ८, उद्धव ठाकरेंचे ९ आणि काँग्रेसचे १४ जण निवडून आलेत. पवार-ठाकरे सोडून जाणार नाहीत आणि जरी गेले तरी एकमेव काँग्रेस पक्ष निवडून येणार. काँग्रेस सर्वाधिक जागा येतील. मविआत काँग्रेस मोठा भाऊ, लोकसभेला आमच्या जागा जास्त आल्यात असंही आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.
दरम्यान जो दुश्मन असेल त्याच्यावरही आमचं प्रेम राहिल आणि जो सोबत येईल त्याच्यावरही आमचे प्रेम राहील असंही आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटलं.
ठाकरे-फडणवीस भेटीवर चर्चा
२०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर मुख्यमंत्रिपदावरून विवाद होऊन युती तुटल्यापासून एकमेकांवर जहरी टीका करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज विधान भवनाच्या आवारात भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक संवादही झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.