मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या(BJP Kirit Somaiya) आणि शिवसेना यांच्यातीव वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सोमय्यांनी शिवसेना नेत्यांच्या भ्रष्टाचारासोबतच आता थेट ठाकरे कुटुंबीयांवर घोटाळ्याचे आरोप लावले आहे. वांद्रे येथील श्रीजी होम्स(Shreeji Homes) या कंपनीचे मालक कोण? असा सवाल करत सोमय्यांनी उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्या मेव्हुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर आरोप केले आहेत.
सोमय्या म्हणाले की, श्रीजी होम्सचे मालक श्रीधर पाटणकर आणि अन्य २ कंपन्या आहेत. श्रीजी होम्स एक बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी असून शिवाजी पार्क येथे त्यांचे प्रकल्प आहेत. श्रीजी होम्समध्ये कोट्यवधी रुपये बेनामी पद्धतीने आले आहेत का? श्रीजी होम्सचे खरे मालक कोण? याबाबत श्रीधरण पाटणकर यांनी स्पष्टता करावी असं त्यांनी म्हटलं आहे. श्रीजी होम्सचा खरा मालक लपवण्यासाठी श्रीजी होम्समध्ये सेल कंपन्यांच्या माध्यमातून पैसे गुंतवण्यात आले. श्रीजी होम्सची बेनामी संपत्ती ईडी आणि आयकर विभागाने जप्त करावी अशी मागणी त्यांनी केली.
तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा ७ कोटींचा कोमोस्टॉक एक्सचेंजचा घोटाळा आहे. माझ्यावर जे आरोप केलेत तुमच्याकडे पोलीस आहेत. पुरावे असतील तर त्यांना द्या. दर आठवड्याला तुमचा घोटाळा बाहेर पडला तर आरोप करता. संजय राऊत हे बोलवते धनी, उद्धव ठाकरे हे मास्टरमाईंड आहेत. किरीट सोमय्या, मेधा सोमय्या, नील सोमय्या यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकही पुरावा दिला नाहीये. आमच्यावर ४२० ची प्रकरणं लावा पण तुमचे घोटाळे बाहेर काढणारच आहे. २००१ चा प्रकल्प होता. जागा मनपाची , केंद्र सरकारने दिली होती, मीरा भाईंदरने राबवलेला, एमएमआरडीएने परवानगी दिली, कांदळवनात शौचालय बांधण्याचा आरोप खोटा आहे. मी जेवढे घोटाळे काढले सगळे पुरावे दिले. उद्धव ठाकरे हिंमत असेल तर माझ्याशी आमने सामने चर्चा करा. माझं चॅलेंज आहे असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण?
श्रीजी होम कंपनीनं दादरमध्ये एक मोठी इमारत बांधली. त्या कंपनीत २९ कोटी ६२ लाख २९ हजार ३२० रुपयांचं मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला. श्रीजी होममध्ये मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर भागीदार आहेत. श्रीजी होममध्ये दोन टप्प्यांत मनी लॉण्ड्रिंग झालं. आधी ५ कोटी ८६ लाख रुपये आणि त्यानंतर २३ कोटी ७५ लाख रुपये कंपनीत गुंतवले गेले, असा आरोप सोमय्यांनी केला. याबद्दलचे पुरावे माझ्याकडे आहेत. मुख्यमंत्री किंवा पोलिसांनी पुराव्यांची मागणी केल्यास सर्व पुरावे देईन असं सोमय्या म्हणाले.