ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २५ - स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन निर्णायक वळणावर पोहोचले असून या मुद्यावर कायेदशीर तोडगा न निघाल्यास या आंदोलनाला हिंसक वळण लागू शकते असा इशारा राज्याचे माजी महाधिवक्ता व स्वतंत्र विदर्भाचे कट्टर पुरस्कारकर्ते श्रीहरी अणेंनी दिला. तसेच या चळवळीदरम्यान हिंसा घडली तर आम्ही त्यास जबाबदार नाही असेही अणेंनी स्पष्ट केले.
' आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले नाही किंवा या मुद्दयावर कायदेशीर तोडगा निघाला नाही तर हे आंदोलन हिंसक होण्याची शक्यता आहे' असे अणे रविवारी नागपूरात झालेल्या कार्यक्रमात म्हणाले. आम्हाला विदर्भाचे आंदोलन शांततेच व्हायला हवे आहे, त्यात कोणतीही हिंसा आम्हाला नकोच आहे. मात्र हिंसेच शक्यता नाकारता येत नाही, असा सूचक इशारा त्यांनी दिला. तसेच अकोल्यातील कार्यक्रमात शिवसैनिकांनी घातलेल्या धुडगुसावरूनही त्यांनी शिवसेनेवर टीका केली.
यापूर्वीही अणेंनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा लावून धरला होता, तसेच आपल्या वाढदिवशी महाराष्ट्राच्या केकमधील विदर्भाचा तुकडा कापून वेगळा केला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.