पुणे : इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन (ईव्हीएम)मध्ये फेरफार झाल्याचा आरोप करीत पुन्हा मतदानपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी होत असताना पुण्यातील प्रगत संगणन विकास केंद्राकडून (सी-डॅक) ‘नेक्स्ट जनरेशन ईव्हीएम’ बनविण्याची तयारी सुरू आहे. या मतदान यंत्राद्वारे कुठल्याही एका मतदान केंद्रावरून कोणत्याही मतदारसंघातील उमेदवारांना मतदान करता येणार आहे. या यंत्राबाबत विचारविनिमय सुरू असल्याची माहिती ‘ईव्हीएम’विषयक तांत्रिक समितीचे सदस्य व सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मुना यांनी दिली. तसेच ‘ईव्हीएम’मध्ये फेरफार करणे अशक्य असल्याचा निर्वाळाही प्रा. मुना यांनी दिला.‘ईव्हीएम’मध्ये फेरफार होत असल्याची तक्रार अनेक पराभुत उमेदवारांनी केली आहे. कोणत्याही उमेदवाराला मतदान दिले तरी ते एका पक्षाच्या उमेदवाराला मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. ‘ईव्हीएम’मधील तथाकथित घोटाळ्याच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना ‘सी-डॅक’ने त्यापुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मतदार यादीत नाव न सापडणे, नोकरीनिमित्त परगावी असलेल्या मतदारांना किंवा काही अन्य कारणास्तव मतदानादिवशी मतदारसंघातील संबंधित मतदान केंद्रावर पोहचू न शकणाऱ्या मतदारांसाठी ‘नेक्स्ट जनरेशन ईव्हीएम’ हे मतदान यंत्र बनविण्यास सुरूवात केली आहे.पत्रकारांशी बोलताना प्रा. मुना म्हणाले, की मतदारांना कोणत्याही मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे.‘नेक्स्ट जनरेशन ईव्हीएम’मध्ये हे तंत्रज्ञान असेल. कोणत्याही मतदान केंद्रावर गेल्यानंतर तिथे असलेल्या अधिकाऱ्यांकडे आपला मतदारसंघ सांगावा लागेल. त्यानुसार संबंधित यंत्रामध्ये या मतदार संघातील उमेदवारांची माहिती पुढे येईल. त्यानंतर मतदारांना मतदान करता येईल. ही मते आपोआप संंबंधित मतदारसंघातील मतदानामध्ये समाविष्ट होतील. याबाबत अद्याप निवडणूक आयोगाशी चर्चा करण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)
...तर कुठूनही करता येईल मतदान
By admin | Published: March 15, 2017 3:51 AM