मुंबई - सरकारमध्ये दुसऱ्या नंबरचं खातं गृहखाते आहे. मुख्यमंत्री गृहखाते आपल्याकडे ठेवतो. देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याकडे ठेवलेले आहे. जेव्हा जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी पूर्वी करायचो, तेव्हा ते सांगायचे. उद्धव ठाकरे यांनी गृहखाते दुसऱ्या पक्षाला देण्याची चूक करू नये, आमचेही तेच म्हणणं होतं. कारण गृहखाते, विधानसभेचे अध्यक्षपद हे त्या काळात संवेदनशील विषय होते त्यामुळे आमचं सरकार पडलं नाहीतर पडले नसते असं मोठं विधान संजय राऊत यांनी केले आहे. फडणवीसांनी दिलेल्या सल्ल्याची आठवण करत राऊतांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे रोख धरल्याची चर्चा आहे. कारण मविआ काळात विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे तर गृहखाते राष्ट्रवादीकडे होते.
संजय राऊतांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सरकार स्थापनेला होणाऱ्या विलंबावर टीका केली. राऊत म्हणाले की, पोलीस यंत्रणा वापरून सत्ताधाऱ्यांनी अनेकांवर दहशत निर्माण केली, अटक केली, निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ही यंत्रणा आपल्या हातात पाहिजे. भविष्यात याच यंत्रणेचा वापर करून एकनाथ शिंदे भाजपाच्या अंगावरही जाऊ शकतात. ही त्यांची वृत्ती आणि विकृत्ती आहे. एका गृहमंत्रिपदावरून हे थांबलेले नाही, त्यामागे वेगळी कारणे असतील असा दावा त्यांनी केला.
तसेच भाजपा जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष, नरेंद्र मोदी-अमित शाहांसारखे मजबूत नेते, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस वैगेरे....एका गृहमंत्रिपदावरून या महाराष्ट्राचं सरकार अधांतरी लटकून पडले आहे मग हे कसले मजबूत लोक? तुमच्यासमोर कोण आहे? तुमच्याकडे स्वत:चा बहुमताचा आकडा आहे. तुमच्याकडे ४० लोक घेऊन अजित पवार आहेत. शिंदे गटाचे लोक भविष्यात काय करतील माहिती नाही पण बहुमत असतानाही तुम्ही सरकार बनवत नाही. सत्ता हाती घेत नाही. राजभवनात सत्तास्थापनेचा दावा अद्याप करत नाही. तुमचे समर्थक आमदार त्यांची नावे द्यायला तयार नाहीत. राज्यपालांकडून तुम्ही सरकार स्थापनेचे निमंत्रण घेतले नाही तरीही तुम्ही मांडव घातला. राजभवन तुम्ही चालवताय का? असं सांगत संजय राऊतांनी शपथविधी सोहळ्यावरून भाजपाला सवाल केले.
दरम्यान, भाजपानं मनात आणलं तर आता जे मागण्या करतायेत ना त्यांना एका मिनिटात चिरडून टाकतील. हे लोक डरपोक आहेत. ईडी, सीबीआयला घाबरून पळून गेलेत. जे निवडून आलेत ते एका स्वबळावर निवडून आले नाहीत. या लोकांना जनमताचा पाठिंबा नाही. फक्त एक गृहमंत्रिपद वादाचा विषय सरकार स्थापनेचा असू शकत नाही. अनेक राज्यात भाजपाने सरकार बनवली आहेत, प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणली आहेत त्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न आहे. फडणवीसांच्या जागी वेगळं कुणी आणलं जातंय का, त्यामुळे हे थांबलंय का..? या सर्व गोष्टींचा उलगडा उद्यापर्यंत व्हायला हवा अन्यथा आम्ही आमचे पुस्तक बंद आहे ते उघडू असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.