पुणे, दि. १ - संघाची पार्श्वभूमी असलेले पंतप्रधान मोदी काबूलवरून अचानक पाकिस्तानात नवाझ शरीफ यांचा पुळका आला म्हणून गेले नव्हते, तर राष्ट्रहितासाठी त्यांनी तो निर्णय घेतला, मात्र याच मोदींची पंतप्रधानपदाआधीची गोध्रा हत्याकांड काळातील मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द कलंकित आहे. पण पंतप्रधानपदी आल्यानंतर मोदी गौतम बुद्ध, महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान सांगत जगातील दहशतवाद कमी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. अमेरिका-चीनशी मैत्री करीत आहेत. शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी मोदी तळहातावर शीर घेऊन पाकमध्ये गेले. दहशतवाद्यांकडून त्यांच्या जिवास धोका होता, त्यांना कोणाचीही गोळी लागू शकली असती. तसे असते एका दिवसात ते संपले असते आणि आपल्याला मंगेश पाडगावकरांच्या आधीच नरेंद्र मोदींसाठी शोकसभा घ्यावी लागली असती... असे खळबळजक विधान नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वागताध्यक्ष मोहन देशमुख, पिंपरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे, प्राचार्य नितीन घोरपडे, अमृता गुलाटी आदी या वेळी उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान समन्वय आणि संवादाबाबत त्यांनी पंतप्रधानांचे उदाहरण देताना त्यांनी त्यांच्या पाकिस्तानच्या दौ-याचा उल्लेख करत त्यांनी तेथील धोक्याची कल्पना दिली. जीवाला एवढा धोका असतानाही मोदी तेथे गेले. मोदी एवढे समर्पण करणारी व्यक्ती असून त्यांचा पक्ष, विचार बाजूला ठेवून आपल्याला सुसंवाद केला पाहिजे, असे सबनीस म्हणाले. 'संघर्षाच्या जागांचा अपवाद करून आता संवादाकडे वळले पाहिजे, त्याचाच भाग म्हणून गुलाम अलींसारख्या पाकिस्तानी कलाकारांना आपल्याकडे कार्यक्रम करू द्यायला हवे' असेही त्यांनी सांगितले.