ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. २९ : आपल्यावरील आरोप हा एका कटाचाच भाग असून, त्यावर बोललो असतो तर सारा देश हादरला असता असे सूचक वक्तव्य भाजपाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करुन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी येथे खळबळ उडून दिली. या बैठकीस अनुपस्थित असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही त्यांनीे चिमटे काढले. याच बैठकीत शिवसेना, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व प्रीती मेनन यांचासुद्धा निषेध करण्यात आला. शहरातील संत बाबाहरदासराम मंगल कार्यालयात झालेल्या या बैठकीस पक्षाचे प्रदेश संघटन मंत्री रवी भुसारी अध्यक्षस्थानी होते. नेहमी शिस्तीत होणारी बैठक आज मात्र प्रचंड घोषणाबाजी व गोंधळाने गाजली.
प्रदेश संघटन मंत्री रवी भुसारी यांच्या भाषणातही वारंवार व्यत्यय आणला जात होता. खडसे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ४० वर्षांच्या कारकिर्दीत आपल्यावर एकही आरोप की आक्षेप नव्हता. मग आताच काय झाले? एकाच दिवसात नाथाभाऊ कसा बिघडला? शिखंडीला केले पुढे न खंजीर से डरता हू न तलवार से, मै लढता आया हू लढता रहूंगा. .ख्वाईश ये है की दुष्मन खांदानी मिले.. मगर मिले तो गैरखांदानी.. असा शेर ऐकवून ते म्हणाले, तरीही मी हार मानत नाही, म्हणून ‘शिखंडीला’ पुढे केले असे सांगून आपल्यावर झालेल्या विविध आरोपांचा पुनरुच्चार करून ते म्हणाले,
पुरावा द्या.
पुरावा दिल्यास केवळ मंत्रिपदच नाही तर राजकारण सोडतो पण पुरावे देऊ न शकल्यास तोंड काळे करा असे आपण नेहमीच विरोधकांना आव्हान दिले, परंतु ही मंडळी एकही पुरावा देऊ शकलेली नाही. त्यामुळे हे ठरवून केलेले काम आहे, असा आरोप त्यांनी केला. खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेतर्फे पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. याच्या निषेधाचा ठराव जोरदार घोषणा देत मांडण्यात आला. तसेच पुरावे नसताना आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, प्रीती मेनन यांचाही यावेळी निषेध करण्यात आला.