ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ३० - शनिशिंगणापूर मंदिरात चौथ-यावर महिलांना प्रवेश देण्यावरुन वाद सुरु असताना अशाप्रकारे बंदी घालता येऊ शकत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हंटलं आहे. ज्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश दिला जातो त्याठिकाणी महिलांना बंदी घालणं चुकीचं असल्याचं मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे. जर महिलांना शनि शिंगणापूर येथे प्रवेश नाकारायचा असेल तर तसा कायदा करा असे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी न्यायालयात याचिका केली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आपलं मत मांडलं आहे. कायद्याने महिलांना कुठेही प्रवेश नाकारला जाऊ शकत नसताना शनी शिंगणापूरला महिलांना प्रवेश कसा नाकारला जातो? असा सवाल मुंबई उच्च न्यायालायने राज्य सरकारला विचारला आहे. न्यायालयाने याप्रकरणी राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागवलं असून दोन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंदिरात जाऊन दर्शन घेणे हा महिलांचा अधिकार आहे आणि त्यांची सुरक्षा ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. शनि शिंगणापूर येथे महिलांना मंदिरात प्रवेश नाकारला जात असेल आणि यावरुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर कारवाई करावी असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
शनीशिंगणापूर मंदिरातील शनी चौथ-यावर महिलांना प्रवेश देण्यावरुन गेले अनेक दिवस वाद सुरु आहेत. एका महिलेने चौथ-यावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर हा वाद पेटला होता. भुमाता ब्रिगेडने देखील आंदोलन करत चौथ-यावर जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गावकरी, मंदिर प्रशासन आणि काही संघटनांनी याला विरोध दर्शवला होता. भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेटदेखील घेतली होती.