मुंबई : सरकारी सेवेत असाल तर तुमचे ओळखपत्र दिसायलाच हवे. दिसले नाही तर आता थेट प्रशासकीय कारवाईलाच सामोरे जावे लागणार आहे. याविषयीचा आदेशच सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आला आहे. या आदेशान्वये सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र दर्शनी भागत लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नागरिक कामाच्या निमित्ताने निरनिराळ्या शासकीय कार्यालयांत येत असतात. नागरिकांना त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नाव आणि पद माहीत व्हावे, यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. अनेक अधिकाऱ्यांना नाव विचारले तरी ते आपली ओळख सांगत नाहीत किंवा ओळखपत्र विचारले तरी ते दाखवीत नाहीत.
या बाबी विचारात घेऊन सरकारने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात असताना ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओळखपत्रे दर्शनी भागावर आहेत की नाही हे पोलिस अधिकाऱ्यांनी तपासावे, असे आदेश देण्यात आले आहेत.