ठाणे : राजकारणात एखादी सुई जरी पडली तरी त्याचा आवाज झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तसे काम कोणीही करू नका. आगामी निवडणुकीत एखाद्याने जरी गद्दारी करण्याचा प्रयत्न केला, तर निवडणुकीनंतर त्याची राजकीय कारकीर्द संपेल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे जिल्ह्यातील नगरसेवकांना दिला आहे.विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठाण्याच्या एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईतील मातोश्री क्लब हाऊसमध्ये झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला. महायुतीच्या दृष्टीने ही निवडणूक खूपच महत्त्वाची असून विधान परिषदेत एखादे जनहिताच्या दृष्टीने विधेयक आल्यावर विरोधक त्याला आक्षेप घेतात. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याची जबाबदारी ही सर्वांचीच असल्याचे त्यांनी सांगितले. मेळाव्याला जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे सर्व आमदार, खासदार आणि ठाणे व पालघर जिल्ह्यांतील नगरसेवक उपस्थित होते. रामदास कदम यांनीही डावखरे यांचे वय झाले असून आता त्यांनी लावणी ऐकावी. मजा करावी, त्यांनी आता निवडणूक लढवू नये, असा खोचक सल्ला दिला. डावखरे यांचा राजकीय प्रवास आता आम्हीच थांबवू, असा इशाराही त्यांनी दिला. खा. संजय राऊत यांनी हितेंद्र ठाकूर यांच्यावर टीका केली. (प्रतिनिधी)- रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता ऐकवून डावखरेंचा समाचार घेतला. ते म्हणाले, आमच्या पक्षाची मते आहेत आठ, आजच पडली फाटकांशी गाठ, आता आपणच लावू या डावखरेंची वाट, मगच थोपटू मुख्यमंत्री, उद्धव अन् मी तुमची पाठ.
गद्दारी केली तर राजकीय कारकीर्द संपेल!
By admin | Published: May 29, 2016 12:38 AM