पुणे : वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वाहनचालकांवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती पासपोर्ट कार्यालयाला देण्याची कारवाई वाहतूक पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार वाहतूक नियमभंगाचे गुन्हे दाखल असलेल्या ९२ जणांची पासपोर्टची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांकडे ९२ जणांवर दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती पासपोर्ट कार्यालयाला पुरविल्याने त्यांना आता लगेचच पासपोर्ट मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच त्यांना चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठीही अटकाव घातला जाणार आहे. गुन्हा दाखल असलेल्या वाहनचालकाना खासगी व शासकीय नोकरी आणि लायसन्स न देण्याबाबत पुणे पोलिसांसकडून शिफारस करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतले आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. अशा वाहनचालकांनी दंडाची रक्कम आॅनलाईन पद्धतीने जमा करावी लागते. याबाबत त्यांना मोबाईलवर संदेश पाठविण्यात येतो. काहीजण वाहतूक नियमभंगाच्या दंडाची रक्कम भरत नाहीत. दंड भरण्यास टाळाटाळ करतात. अशा वाहनचालकांची माहिती पासपोर्ट, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पोलिसांच्या चारित्र्यपडताळणी विभागाला देण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक पोलीस उपायुक्त सातपुते यांनी दिला होता. जे वाहनचालक दंड भरत नाही तसेच टाळाटाळ करतात, अशांनी पासपोर्ट कार्यालयात अर्ज केला होता. अर्ज आल्यानंतर अशी प्रकरणे पोलिसांकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली होती. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी नियमभंग केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ९२ जणांची यादी तातडीने पारपत्र कार्यालयाकडे पाठविली.
वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे ९२ जणांच्या पासपोर्ट मिळवण्याच्या प्रक्रियेला तूर्त अटकाव घालता आला आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. नियमभंग करणे हे फक्त दंडाच्या रक्कमेपुरते मर्यादित राहिले नाही. ज्यांच्या वाहतुकीच्या नियमभंगाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी तातडीने दंडाची रक्कम भरावी. अन्यथा त्यांना भविष्यात पारपत्र तसेच चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येणार आहे. वाहतूक पोलिसांचे ई-चलन प्रलंबित आहे की नाही हे पाहण्यासाठी पुणे ट्रॅफि कॉप. नेट या संकेतस्थळावर खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गुन्ह्यात निर्दोष सुटल्यावर मिळणार पासपोर्ट
दखलपात्र, मोटार वाहन कायद्यााअंतर्गत दाखल गुन्हा दाखल झाल्यास एखाद्याा व्यक्तीने पासपोर्ट मिळवण्याबाबत अर्ज सादर केल्यास त्याबाबतची विचारणा पासपोर्ट कार्यालयाकडून पोलिसांकडे होती. पोलिसांकडून पडताळणी केल्यानंतर (व्हेरिफिकेशन) याबाबतचा अहवाल पासपोर्ट कार्यालयाकडे पाठविण्यास येतो. गुन्हा दाखल झाल्यास पासपोर्र्ट मिळत नाही. जोपर्यंत दाखल गुन्ह्यात निर्दोष मुक्तता होत नाही तोपर्यंत पासपोर्ट मिळणार नाही, असे या कारवाईतून स्पष्ट होते.