नितीन जगताप
गणेशोत्सवासाठी दरवर्षी हजारो चाकरमानी कोकणात जातात. काही रेल्वे, एसटीने तर काही खासगी वाहनाने गावी पोहोचतात. चाकरमान्यांच्या संख्येचा विचार करता दरवर्षी एसटी आणि रेल्वेकडूून जादा फेऱ्या सोडल्या जातात. रेल्वेने आतापर्यंत २०८ फेऱ्यांची घोषणा केली आहे; पण सामान्यांना तिकीट मिळत नाही. मग, खासगी बसने जाण्याशिवाय पर्याय नसतो. खासगी बस दुप्पट-तिप्पट भाडे आकारून प्रवाशांचा खिसा कापतात. त्यामुळे रेल्वेचे तिकीट मिळेना अन् खासगी बसचा दर तिप्पट, मग कोकणात जाणार कसे, असा प्रश्न मुंबईकरांना पडतो.
यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी रेल्वे आरक्षण चालू झाले आहे. या मार्गावरील नियमित धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण अवघ्या काही मिनिटांत फुल्ल होऊन जवळ जवळ सर्वच गाड्यांच्या सर्वच श्रेणीचे आरक्षण स्थिती रिग्रेट दाखवत आहे. १६ सप्टेंबरचे आरक्षण फक्त एका मिनिटात रिग्रेट दाखवत होते, त्यामुळे दलाल आणि काही रेल्वे अधिकारी मिळून काळा बाजार करीत असल्याचा संशय मूळ धरत आहे. याआधी याविषयी अनेकदा तक्रारी करूनही कोकण रेल्वेने याबाबत काही चौकशी केली नाही, असा आरोप प्रवाशांद्वारे केला जात आहे. कोकण रेल्वेमार्गावर प्रवासी संख्या जास्त आणि गाड्या कमी यामुळे येथे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. कोकणात गावी जाण्यासाठी साधारण ६०० ते ७०० रुपये असलेले तिकीट हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत विकून दलाल प्रवाशांच्या असहायतेचा फायदा घेतात. प्रवाशांकडे दुसरा पर्याय नसल्याने ते महागडे तिकीट खरेदी करून प्रवास करतात.
तिकिटावर पीएनआर असतो, त्याचा वापर करून सॉफ्टवेअरद्वारे प्रवाशाचे नाव टाकले जाते. दलाल आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून गैरमार्गाने ऑनलाइन तिकिटे मिळवतात. ते जलदपणे तिकीट बुकिंगसाठी काही सॉफ्टवेअर वापरतात. काही दलाल आसाम, छत्तीसगडसारख्या राज्यात एखाद्या छोट्या रेल्वे स्थानकात तिकीट विंडोसमोर आपली माणसे उभी करून हंगामाच्या काळातील गाड्यांची तिकिटे काढतात. या सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ती माहिती अगोदरच भरून काही क्षणात तिकीट आरक्षित करता येते. काही रेल्वे अधिकाऱ्यांच्या मदतीने ते काळाबाजार करीत असल्याचा संशय आहे. ही तिकिटे तिप्पट दराने दिली जातात.
गणेशोत्सवात रेल्वे प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळत नाही. काही मिनिटांमध्ये तिकीट आरक्षण फुल्ल होते. त्याची चौकशी व्हायला हवी. खासगी बसचालकही प्रवाशांची लूट करतात. त्यांच्यावर कोणाचाही वचक नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवशाहीसारख्या गाड्या का सोडल्या जात नाहीत? - दीपक चव्हाण, गणेशभक्त कोकण प्रवासी संघटना