मुंबई: एखाद्याला राज्य पातळीवरचे मोठे राजकारण करायला जमत नसेल तर त्यांनी राजकारण सोडून द्यायला पाहिजे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना टोला लगावला. लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. धनंजय व पंकजा मुंडे या भावंडांतील अंतर्गत स्पर्धेमुळे लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणूक रंगतदार झाली होती. पंकजा मुंडे आणि भाजपाच्या नेत्यांनी कुशलपणे राजकीय व्यवस्थापन करत या लढतीत बाजी मारली. भाजपाचे सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा 76 मतांनी पराभव केला. याविषयी बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या विरोधकांनी राजकारणातील अपरिपक्वतेची परिसीमा दाखवून दिली. राष्ट्रवादीने या निवडणुकीसाठी रमेश कराड यांना पक्षात घेतले. मात्र, त्यानंतर कराड यांच्यावर इतका दबाव आला की, त्यांनी माझ्याशी चर्चा करुन निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीकडे स्वत:चा अधिकृत उमेदवार राहिला नाही. अखेर त्यांना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला. हे सर्व करताना त्यांनी मित्रपक्षांना कुठेही विश्वासात घेतले नाही. त्यामुळे या निवडणुकीत सुरुवातीपासूनच विरोधकांचं गणित चुकत होतं. राज्यपातळीवर राजकारण करण्यासाठी जी समज लागते ते करण्यात विरोधक कमी पडले. त्यामुळे विरोधक केवळ जिंकण्याच्या वल्गना करत राहिले. परंतु राजकारणात अंतिम निर्णय आल्याशिवाय कोणतेही मत व्यक्त करणे योग्य नसते. त्यामुळे मी स्वत:चे काम करत राहिले आणि केवळ वल्गना करणाऱ्यांना आज तोंडघशी पडावे लागले, असे पंकजा यांनी सांगितले.
जमत नसेल तर राजकारण सोडून द्या, पंकजांचा धनंजय मुंडेंना सणसणीत टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:06 PM