ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - अजूनही गझलसम्राट गुलाम अली यांनी मुंबईत कार्यक्रम करण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना कडेकोट सुरक्षा पुरवण्यात येईल याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य सरकारचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या विरोधानंतर मुंबईतला गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पोलीसांनी सुरळित पार पाडून दाखवला. अशाचप्रकारे गुलाम अलींच्या कार्यक्रमालाही संरक्षण देऊ अशी खात्री फडणवीसांनी आज पुन्हा एकदा दिली आहे. एवढेच नव्हे तर कायदा मोडणारे आमच्या पक्षाचे किंवा आमच्या मित्रपक्षाचे असतिल तर त्यांनाही तुरुंगात धाडायला कमी करणार नाही असे स्पष्ट आश्वासन एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
कलाकार असलेल्या गुलाम अलींना धर्माशी अथवा देशाशी जोडणे चूक असल्याचेही ते म्हणाले.
गेल्यावेळी आयोजकांनी नमतं घेतल्यामुळे कार्यक्रम होऊ शकला नाही, परंतु कार्यक्रम केलाच तर आम्ही चोख बंदोबस्त पुरवू असे ते म्हणाले. कसुरींना दिलेली सुरक्षा म्हणजे त्यांची मते मान्य असणं नव्हे. राजधर्माचं पालन करण्यासाठी आम्ही सुरक्षा दिल्याचे फडणवीस म्हणाले.
अर्थात, शिवसेनेबरोबर सरकार म्हणून अत्यंत सुरळित काम सुरू असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. मंत्रिमंडळामध्ये दोन्ही पक्ष असून सगळ्या निर्णयांवर एकमत असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठीमध्ये करण्यात आलेल्या टिपणीचा राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये गैर अर्थ काढण्यात येतो आणि चुकीच्या बातम्या पसरतात असेही ते म्हणाले.