ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर व कोल्हापुरात महिलांना मंदिरात प्रवेश मिळवून दिल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र 'देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश केल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देऊ' असा धमकीवजा इशारा शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी दिला आहे.
हाजी अली दर्गा प्रवेशासाठी देसाई यांनी ‘हाजी अली सबके लिए’ या फोरमची स्थापना केली असून येत्या २८ तारखेपासून दर्गा प्रवेशासाठी धरणं आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र शिवसेना उपनेते हाजी अराफत शेख यांनी देसाई यांना विरोध दर्शवत ' जर त्यांनी हाजीअली दर्ग्यातील मजार परिसरात घुसण्याचा नाहक प्रयत्न केला, तर चपलांचा प्रसाद देऊन त्यांचे स्वागत करू’ असा स्पष्ट इशारा दिला आहे.
‘तृप्ती देसाई या विनाकारण खोट्या प्रसिध्दीसाठी लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळून नाहक वाद निर्माण करीत आहेत. आज राज्यात स्त्रीभृणहत्या, महिलांचे शोषण, महिला सुरक्षा, दुष्काळग्रस्त भागातील मुलींचे मोडणारे विवाह, स्त्री-शिक्षण असे अनेक गंभीर प्रश्न असताना केवळ धार्मिक विषयांमध्येच तृप्ती देसाईंना एवढा रस कशासाठी आहे?' असा सवालही शेख यांनी विचारला आहे. तसेच देसाई यांनी हे सर्व वायफळ प्रकार बंद करावेत आणि सामाजिक हिताचे आणि लोकोपयोगी उपक्रम हाती घ्यावेत, असा सल्लाही शेख यांनी दिला.
दरम्यान शेख यांची भूमिका वैयक्तिक असून शिवसेना पक्षाची ही अधिकृत भूमिका नाही, असे शिवसेना प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी स्पष्ट केले आहे. मंदीर असो किंवा दर्गा अथवा मशीद, महिला आणि पुरूष सर्वांनाच समान अधिकार असावेत. पुरूषांना सर्व धार्मिक स्थळांमध्ये जे अधिकार आहेत ते सर्व स्त्रीयांनाही असावेत. तसेच न्यायालयाने एकदा निर्णय दिल्यावर त्याची अमलबजावणी सरकार व पोलीसांनी करायलाच हवी, असे त्यांनी म्हटले आहे. आणि म्हणूनच महिलांच्या धार्मिक स्थळातील प्रवेशास कोणत्याही प्रकारे विरोध करणे योग्य नाही. हाजी अराफत शेख यांची मत हे पक्षाचे अधिकृत मत नाही याची समज त्यांनाही पक्षाने दिलेली आहे, असेही गो-हे यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेच्या धमक्यांना घाबरत नाही - तृप्ती देसाई
आम्ही २८ एप्रिल रोजी हाजी अली दर्ग्यात जाणारच असा निर्धार भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केला आहे. तसेच आम्ही शिवसेनेच्या धमक्यांना घाबरत नाही, अशा धमक्यांनी काही होत नसल्याचेही देसाई यांनी म्हटले आहे.
Our group would be going to Haji Ali Dargah on April 28,Shiv Sena's threats won't work-Trupti Desai, Activist pic.twitter.com/fvhHeiukvn
— ANI (@ANI_news) April 23, 2016