लोकमत न्यूज नेटवर्क, म्हारळ (कल्याण): ओबीसी, आदिवासी, धनगर समाजाला बाधा न पोहोचविता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी वरप येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली. मात्र, त्याचवेळी मराठा आरक्षणासाठी काही जण टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईत येण्याच्या घोषणा देत आहेत. जर कोणी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कुणाचीही गय केली जाणार नाही. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही हे लक्षात ठेवावे, असा इशाराही मनोज जरांगे-पाटील यांचे नाव न घेता दिला.
महाराष्ट्रात सर्व जातीधर्माची परंपरा आहे. सर्वांनीच सर्व जातीधर्माच्या श्रद्धास्थानांचा आदर केला पाहिजे. शाहू, फुले ,आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा हाच विचार असून, तोच पुढे नेण्याचे काम आपण केले पाहिजे, असे पवार यांनी सांगितले. वाचाळवीरांची संख्या जास्त आहे. विकासावर ते काहीच बोलत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
आम्ही त्यांना सरकार मानत नाही: जरांगे
त्या येवल्यावाल्याची बाजू ओढू नका. कधीतरी जातीचा कळवळा येऊ द्या. स्वत:च्या स्वार्थाचे पाहिले तर मराठे राजकीय करिअर उठवतील. आम्ही मुंबईला शांततेत येणार आहोत. आम्हाला अटक करून दाखवा. मग मराठेही शांततेतच उत्तर देतील, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना दिला. जरांगे पाटील यांनी रविवारी गाठीभेटी दौऱ्यातील खामगाव (ता.गेवराई) येथील सभेत अजित पवारांना उत्तर दिले. ते अपघाताने सत्तेत आलेले आहेत. ते असे म्हणत असतील तर त्यांना सरकार मानत नाहीत. आम्ही मुंबईला जाणार, ओबीसीतूनच आरक्षण घेणार, तुम्ही कारवाई करा, मराठे तुमचा राजकीय सुपडा साफ करतील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
मराठ्यांना आरक्षण द्या, पण ओबीसीच्या ताटातून नको- ॲड. आंबेडकर; संविधान वाचवण्याचे आवाहन
नरसी (जि. नांदेड) : मराठ्यांना आरक्षण मिळावे, पण ओबीसींच्या ताटातून देऊ नये. त्यांना वेगळे आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही. तसेच, कोणतेही आरक्षण टिकण्यासाठी संविधान वाचले पाहिजे. त्यामुळे आरक्षणासाठी सर्वप्रथम संविधान वाचविण्यासाठी आपण एकत्र येऊया, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
ओबीसी जनमोर्चाच्या वतीने नरसी (ता. नायगाव, जि. नांदेड) येथे रविवारी आयोजित ओबीसी आरक्षण बचाव महामेळाव्यात ते बोलत होते. माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. मंचावर माजी खासदार विकास महात्मे, प्रा. टी. पी. मुंडे, हरिभाऊ शेळके, चद्रकांत बनकर, कल्याण दळेकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती. ॲड. आंबेडकर म्हणाले, सध्या शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. देशात महागाईने कहर केला आहे. असे असताना संविधान बदलण्याचा घाट घातला जात आहे.
‘ओबीसी चळवळ आम्हीच सुरू केली’
आम्ही नेहमीच ओबीसींसोबत आहोत. ओबीसींची चळवळ आम्हीच सुरू केलेली आहे, असे ॲड. प्रकाश आंबेडकर ओबीसी मेळाव्याच्या आधी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. नांदेडच्या मेळाव्याला तुम्ही येणार म्हणून भुजबळ आले नाहीत का, असा प्रश्न विचारला असता ते का आले नाही, त्यांनाच विचारा, असा सल्ला ॲड. आंबेडकर यांनी दिला. मित्र कोण, शत्रू कोण हे ओबीसी समाजाने ओळखावे. कुणी ओबीसीमधील जातीचा म्हणून नेता होत नाही. सरड्यासारखे रंग बदलणाऱ्यापासून सावध राहा, असेही ते म्हणाले.