मुंबई - राज्यात शिंदे गट आणि भाजपानं एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. मात्र आता शिंदे गटाचे प्रवक्ते आणि भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंवरील टीकेवर दीपक केसरकरांनी भाजपा नेते नारायण राणे आणि त्यांच्या मुलांवर टीका केली होती. त्यावरून आता निलेश राणे यांनी केसरकरांना प्रत्युत्तर दिले आहे.
निलेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंवर कुणी बोलायचं नाही. आम्ही अडीच वर्ष जहरी टीका केली तेव्हा दीपक केसरकर कुठे होते? ठाकरे सरकारमध्ये कुणी मंत्री केले नाही तेव्हा ते बोलत नव्हते. पण आज साक्षात्कार झाला आहे. उद्धव ठाकरे डुप्लिकेट हिंदुत्व दाखवत होते म्हणून तुम्ही इथे आलात ना.. उद्धव ठाकरेंना मानत असता तर त्यांना सोडून का आलात? तुम्ही हिंदुत्वासाठी आलात ना. असं सांगत अडीच वर्ष भाजपा कार्यकर्त्यांना रस्त्यावर मारलं तरी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला. त्याच्यामागे आम्ही उभे आहोत असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.
तसेच मी सुरूवात केली नाही. दीपक केसरकरांनी केली. स्वत:चा शहाणपणा गाजवायचा प्रयत्न केला. जेवढी गरज आम्हाला आहे तेवढीच गरज तुम्हाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे राजकीय कुबड्या दीपक केसरकरांना मिळाल्या आहेत. ते शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. भाजपाचे नाहीत. राणेंनी काय करावं हे दीपक केसरकरांनी बोलू नये. आमचं प्रेम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांवर आहे. आमचा पक्ष आदेशावर चालतो. आम्हाला नेत्यांनी आदेश दिले आम्ही गप्प बसू. दीपक केसरकर स्वत:ला विश्वप्रवक्ते समजायला लागतील. कोकणातून जो माणूस संपला तो पुन्हा राजकारणात जिवंत झाला आहे अशा शब्दात निलेश राणेंनी केसरकरांवर हल्लाबोल केला.
दरम्यान, राणेंच्या मुलाने केसरकरांचं राजकारण संपवायचं ठरवलं होते. परंतु योगायोगाने तुम्ही आमच्याकडे आले आहेत. नाही त्या विषयात नाक खुपसू नका. त्यांना राजकीय जीवनदान मिळालं आहे. केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वाटोळं लावलं. एक दीपक केसरकर मंत्री झाल्याने काही बिघडत नाही. केसरकर हे लहान व्यक्ती आहेत असंही निलेश राणे म्हणाले.