बारामती - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा रोखठोक स्वभाव आणि आक्रमक शैली सर्वांनाच माहिती आहे. याचा अनुभव पुन्हा एकदा बारामती नगरपालिकेच्या नगरसेवक मिटींगमध्ये पाहायला मिळाला. मानापमान नाट्यावरुन राष्ट्रवादी नगरसेवकांमध्ये सुरु असणारा वाद मिटविण्यासााठी अजित पवारांनी सर्वांनाच खडेबोल सुनावले.
बारामतीच्या शासकीय विश्रामगृहात नगरपालिकेच्या नगरसेवकांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी नगरसेवक एकमेकांबद्दल तक्रारीचा पाढा वाचत होते. काही क्षणी नगरसेवकांच्या या शाब्दीक युद्धात अजितदादांनी हस्तक्षेप केला. मात्र ही भांडणे संपत नसल्याचे पाहत अजित पवार संतप्त झाले. शेवटी अजित पवारांनी सर्वांना कानपिचक्या देत सगळ्यांनी राजीनामे द्या. थेट प्रशासक बसवून त्यांच्याकडून सगळी कामे करुन घेतो अशा शब्दात सुनावले. त्याचसोबत सत्ता आल्यानंतर शहराचा विकास करायचा की तुमच्यातील वाट मिटवायचे असा प्रतिसवालही नगरसेवकांना केला.
नगरसेवकांतील कलगीतुरा थांबवण्यासाठी अजित पवारांनी सर्वांना एकदिलाने काम करा नाहीतर राजीनामे देऊन घरी जा, मी प्रशासक आणून विकासकामे करुन घेतो अशी तंबी दिल्याने नगरसेवक शांत राहिले. त्यामुळे याची चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात सुरु होती. अजित पवार तडकाफडकी निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. अलीकडेच अजित पवारांनी केलेलं बंड राज्यभर गाजलं होतं. २२ नोव्हेंबरच्या रातोरात अजित पवारांनी भाजपाशी हातमिळवणी करत राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबतच पवार कुटुंबात मोठी फूट पडल्याची चित्र निर्माण झालं होतं.
अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. अजित पवारांच्या बंडामुळे आमदार फुटण्याची भीती पक्षाला होती. अनेक आमदार बेपत्ता होते. परंतु काही दिवसात आमदार माघारी परतले. तसेच अजित पवारांचे बंड शमविण्यात शरद पवार आणि कुटुंबाला यश आलं. अखेर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस सरकारमधून उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय झाले.