ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 5 - लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दारू पिऊ नका अशी विनवणी करणाऱ्या पत्नीला तिच्या पतीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना कल्याण नजीक असलेल्या वरप येथे घडली होती. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र सात दिवसाच्या उपचारानंतर शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी पती संतोष शिरसिंग याला अटक देखील केली होती.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सर्वत्र दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत असताना, कल्याण नजीक असलेल्या वरप गाव मात्र एका घटनेने हादरले होते. संतोष शिरसिंग आपल्या कुटुंबासह वरप गावात प्रदीप भोईर चाळीत राहतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी संतोष दारू पिऊन घरी आला. संतोषला त्यांची पत्नी पूजा हिने आज दिवाळी सारखा सण, त्यात लक्ष्मी पूजन असल्याने आज दारू पिऊ नका अशी विनवणी केली. मात्र संतापलेल्या संतोष ने पुजाशी वाद घालणे सुरु केले. संतापाच्या भरात संतोष याने घरातील एका बाटली मधील रॉकेल पूजाच्या अंगावर ओतुन दारूच्या नशेत पेटवून दिले. आजू बाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पूजाला उपचारासाठी उल्हासनगर सेंट्रल रुग्णालयात दाखल केले होते.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पूजाने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संतोष विरोधात गुन्हा दाखल करत त्याला तात्काळ अटक केली होती. गेले आठवडाभर उपचार घेत मृत्यूशी झुंज देणार्या पुजा हिचा शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेमुळे वरप गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.