ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - अमेरिकेने लादेन याच्याबाबतीत पाकिस्तानात घुसून त्याला मारण्याचे धैर्य दाखवले तशी हिंमत मोदी सरकार दाखवणार नसेल तर आंतरराष्ट्रीय स्तरांवरील तुमच्या स्थानाचा आम्हाला काय फायदा ? असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे.
पाकिस्तानी कारस्थानाचे पुरावे शोधण्यापेक्षा ठोस लष्करी कारवाई करुन पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
रशियाचे पुतिन व अमेरिकेचे ओबामा पंतप्रधानांचे मित्र असतीलही, पण त्यांना आलिंगने देऊन पाकिस्तानची बोबडी वळत नाही. रशिया, अमेरिका हे देश कश्मीर वाचवणार नाहीत. जागतिक नेत्यांनी उधळलेल्या शब्दसुमनांपेक्षा आमच्या लष्कराला बळ देणे गरजेचे आहे असे अग्रलेखात म्हटले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- हिंदुस्थानचे जगद्विख्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तबगारीचा डंका विश्वात पिटला जात आहे. रविवारी दिवसभर मोदी यांच्यावर त्यांच्या वाढदिवसासाठी जागतिक नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच कश्मीरातील आमच्या लष्करी तळांवर पाकड्या अतिरेक्यांनी भयंकर दहशतवादी हल्ला करून देशाला हादरा दिला आहे. गुजरातमध्ये वाढदिवसाचा भव्य आणि ऐतिहासिक केक कापला जात असताना पाकड्या अतिरेक्यांनी जम्मू-कश्मीरच्या उरी येथील लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयावर हल्ला केला. या हल्ल्यात आमचे १७ जवान शहीद झाले. पठाणकोटच्या हवाई तळावर झालेल्या हल्ल्यापेक्षा हा मोठा हल्ला असून हिंदुस्थानच्या संरक्षण सज्जतेची ही बेअब्रू आहे. मोदी यांच्या जागतिक स्तरावरील प्रतिमेला तडा देण्याचे हे कारस्थान आहे.
- कश्मीरात गेल्या चार महिन्यांपासून हिंसेचा आगडोंब उसळला आहे. राज्य सरकार कोलमडून पडले आहे व केंद्राच्या इशार्यांना कुणी जुमानत नाही. श्रीनगर-बारामुल्लाच्या रस्त्यांवर उतरून मिसरूड न फुटलेली पोरं आमच्या लष्करावर हल्ले करतात यास काय म्हणावे? पाकिस्तान झिंदाबादचे नारे देत लोक रस्त्यावर थयथयाट करतात. अशा वेळी कश्मीरातील सरकार बरखास्त करून तेथे ‘मार्शल लॉ’ पुकारायला हवा. कारण राष्ट्रपती राजवटीनेही कश्मीरातील परिस्थिती नियंत्रणाखाली येण्याची शक्यता नाही. (कश्मीरमध्ये भाजपने केलेला राजकीय प्रयोग फसल्याचे मत डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनीही व्यक्त केले आहे.) कश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे व स्थिती काँग्रेस राजवटीपेक्षा जास्त बिघडली आहे हे सत्य स्वीकारायला हवे.
- जम्मू-कश्मीरच्या लष्करी मुख्यालयावर फक्त चार अतिरेकी हल्ला करतात व आमचे १७ जवान मारले जातात. पाकिस्तानने केवळ चार अतिरेक्यांचा मोबदला देऊन हिंदुस्थानच्या १७ जवानांचा बळी घेतला. त्यामुळे युद्धात जिंकले कोण? चार अतिरेक्यांचा खात्मा केला म्हणून विजयी आरोळ्या ठोकायच्या की १७ जवान नाहक गमावले म्हणून अश्रू ढाळायचे याचा विचार सवाशे कोटी जनतेने आता करायला हवा. पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावरच अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी समोर आल्या होत्या. कश्मीरसंदर्भात परिस्थिती पूर्वीपेक्षा चिघळली आहे व पाकिस्तानने सरळसरळ युद्ध पुकारले आहे. हिंदुस्थानचे सर्वच राज्यकर्ते फक्त इशारे देण्याशिवाय काही करताना दिसत नाहीत. पाकिस्तानातील हाफिज सईदसारखे लोक कश्मीरप्रश्नी हिंदुस्थानला धडा शिकवण्याची धमकी देऊन थांबत नाहीत, तर पठाणकोटपासून उरीपर्यंत आपल्या लष्करी तळांवर हल्ला घडवून आणत आहेत.
- पठाणकोट हल्ल्यानंतरही आपण फक्त पाकिस्तानी हाताचे पुरावे शोधत राहिलो व आताही त्यापेक्षा वेगळे घडणार नाही. पाकिस्तानी कारस्थानाचे पुरावे कसले शोधता? असे पुरावे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कवडीमोलाचे ठरतात. अमेरिकेने लादेन याच्याबाबतीत पाकिस्तानात घुसून त्याला मारण्याचे धैर्य दाखवले तशी हिंमत मोदी सरकार दाखवणार नसेल तर आंतरराष्ट्रीय स्तरांवरील तुमच्या स्थानाचा आम्हाला फायदा नाही. रशियाचे पुतिन व अमेरिकेचे ओबामा पंतप्रधानांचे मित्र असतीलही, पण त्यांना आलिंगने देऊन पाकिस्तानची बोबडी वळत नाही. उलट त्यांच्यातील सैतान जरा जास्तच चवताळतो आहे. कश्मीर व पाकिस्तानच्या बाबतीत जागतिक नेते मदत करणार नाहीत. येथील राज्यकर्त्यांनीच हे काम हिमतीने केले पाहिजे.
- पाकिस्तानच्या फक्त चार अतिरेक्यांना जे जमते ते आमच्या भव्य संरक्षण दलास का जमू नये? बलुचिस्तानच्या मूठभर बंडखोरांना तोंडी पाठिंबा हे कश्मीर प्रश्नावरील उत्तर नाही. पाकिस्तानचे अतिरेकी आमच्या जवानांची मुंडकी छाटतात, संसदेवर हल्ला करतात, पठाणकोट हवाई तळावर घुसतात, उरीच्या लष्करी मुख्यालयात घुसून आगी लावतात व १७ जवान मारले जातात. कश्मीरात मरणार्या जवानांना फक्त शहीदाचा दर्जा देऊन आणि त्यांच्या शवपेट्यांवर पुष्पचक्रे अर्पण करून हे संपणार नाही. राजनाथ सिंह अमेरिकेत जाण्यासाठी विमानाच्या पायर्या चढतच होते, पण उरी येथे दहशतवादी हल्ला झाल्याने त्यांनी परदेश दौराच रद्द केला. रशिया, अमेरिका हे देश कश्मीर वाचवणार नाहीत. जागतिक नेत्यांनी उधळलेल्या शब्दसुमनांपेक्षा आमच्या लष्कराला बळ देणे गरजेचे आहे.
- कश्मीरमध्ये पुन: पुन्हा दहशतवादी हल्ले होत आहेत. त्यांना अद्याप आळा बसलेला नाही. हे अपयश कोणाचे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे आणि या हल्ल्यामागे जे कोणी असतील त्यांना सोडणार नाही असे स्पष्ट केले आहे. पंतप्रधानांचा हा इशारा योग्यच आहे, पण त्याचा परिणाम पाकिस्तानसारख्या देशावर किती आणि कधी होणार हा प्रश्न कायमच आहे. चार अतिरेक्यांच्या आत्मघाती हल्ल्यात १७ जवान प्राण गमावतात हे संभाव्य महासत्तेस शोभणारे नाही. पण करायचे काय?