Maharashtra EVM Issue: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशीनचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत विरोधकांनी ईव्हीएम हटवण्याची मागणी लावून धरली आहे. भाजपसह सत्तेतील इतर मित्रपक्ष विरोधकांचे आरोप फेटाळून लावत आहे. सोशल मीडियावरही या मुद्द्यावरून जोरदार कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत असून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे भाजप समर्थकांवर भडकल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. तिन्ही पक्षांना मिळून ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीसह विरोधकांकडून ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यात मारकडवाडीतील ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी केल्याने ही चर्चा आणखी वाढली आहे.
महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत आरोप-प्रत्यारोप
ईव्हीएमचा मुद्द्याभोवती चर्चेने फेर धरला असून, सोशल मीडियावर महाविकास आघाडीविरुद्ध महायुती समर्थक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. महायुतीचे नेतेही महाविकास आघाडीचे आरोप फेटाळून लावत असून, जमिनीवर काम करण्याचा सल्ला देत आहेत.
सुषमा अंधारेंनी केला सवाल
"कुणावरही ईडीची धाड पडली की, भाजपचे लावारिस भक्तुल्ले चेकाळून म्हणतात, कर नाही त्याला डर कसली? मग लोकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतल्यावर आपापल्या नेत्यांना सांगा ना, घ्या बॅलेटवर निवडणुका"
"तुम्ही ईव्हीएम सेट नाही केले. तुमच्यासोबत लोकमत आहे, तर बॅलेटवर सिद्ध करा. कर नाही त्याला डर कसली?", असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
मारकडवाडी शरद पवारांनी घेतली सभा
ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी राज्यात पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी केली. तसा मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचे नियोजन ग्रामस्थांनी केले होते. पण, प्रशासनाने अमान्य केली. याच गावात रविवारी शरदप पवार यांच्या अध्यक्षतेखाली ईव्हीएमच्या मुद्द्यावर सभा घेतली.