मुंबई – दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉनमुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. यातच केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना अलर्ट दिला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांची कठोर स्क्रिनिंग आणि टेस्टिंग करावं अशी सूचना केंद्राने केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही ओमीक्रॉन संकटावर खबरदारी म्हणून तातडीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांची महत्त्वाची बैठक बोलावली.
या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी कोविडच्या नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा असे आदेश दिले आहेत. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष द्या. लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची सर्व बंधनं पाळावीच लागतील असा सतर्कतेचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपेंसह आरोग्य विभागाचे सचिवदेखील उपस्थित होते. ओमीक्रॉनवर चर्चा करण्यासाठी मुखयमंत्र्यांनी सोमवारी तातडीची मंत्रिमंडळ बैठकही बोलावली आहे.
घातक व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील होणार
दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरिएंट डेल्टापेक्षा घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन घेण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत दिल्या आहेत. सर्व रुग्णालये तसेच कोविड उपचार केंद्रांमधील आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करुन त्या कार्यरत करण्यासाठी सज्ज करून ठेवण्याचे निर्देशही सरकारकडून देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरुन शनिवारी ही बैठक घेण्यात आली होती. सामान्य नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले असून आता आपल्याला गाफिल राहून चालणार नाही, कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांची रुग्णालये सज्ज ठेवा. सुदैवाने सध्या रुग्ण नसल्याने बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यंत्रणा बंद आहेत. रुग्णालयांमधील आयसीयू कक्ष, ऑक्सिजन प्लान्ट, व्हेंटिलेटर यंत्रे यांची तपासणी करुन ते सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले होते.