नागपूर – मराठा आरक्षण हा प्रश्न ज्वलंत मुद्दा झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ५० टक्क्यातून द्या अन्यथा ५० टक्क्याच्या बाहेरून द्या. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १३ वा दिवस आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती खालावतेय. जर त्यांच्या प्रकृतीला बरे वाईट झाले तर ते महाराष्ट्र सरकारला महाग पडेल. महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर कुठल्याही पद्धतीने मराठ्यांना आरक्षण द्या असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी दिला आहे. नागपूरात झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
दिलीप जगताप म्हणाले की, आरक्षणची मर्यादा वाढवा, हे राज्य सरकारच्या हाती नाही हे आम्हाला माहिती आहे. परंतु जर राज्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत जावं, हवं तर त्यांच्या तिकीट मी काढतो. तिथे मोदींना सांगावे, आम्हाला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नाही. ताबोडतोब मर्यादा वाढवा आणि आम्हाला आरक्षण द्या, आता ओबीसी समाजाने काही उपोषणाला बसलेत त्यांचा बोलविता धनी कोण आहे. दोन समाजात फूट पाडण्याचा काहींचा राजकीय प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच मराठा आरक्षणाविरोधी सर्व सूत्रे नागपूरातून हलतात, शोधा, मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर सरसकट द्या, कुणबी वैगेरे शोधत काय बसता? ओबीसींचं आंदोलन राजकीय स्टंट आहे. आम्ही ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मागितले नाही. आम्ही आरक्षण द्यावे अशी मागणी करतोय तुम्ही कशाला रस्त्यावर उतरताय? तुम्ही रस्त्यावर उतरणार असाल तुम्ही दुसऱ्यासाठी काम करत असाल त्याचे पडसाद सामाजिक संतुलन बिघडले तर त्याची जबाबदारी ओबीसी संघटनांवर आहे असं दिलीप जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीत ५० टक्क्यांच्या आत मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत तोडगा काढावा, त्याचसोबत ओबीसी नेत्यांची सरकारने समजूत काढावी. १६ टक्के नव्हे तर १० टक्के द्या पण आरक्षण द्या, नाहीतर त्याचा जीव जाईल अन्यथा महाराष्ट्र पेटेल, काल तिघांनी आत्महत्या केली, स्व. अण्णासाहेबांनी त्यासाठी जीव दिला. आता अंतिम टप्प्याचा लढा आहे. हा यशस्वी व्हायला पाहिजे जर हा लढा यशस्वी झाला नाही तर एकाही मराठा नेत्यांना फिरू देणार नाही. जो कोणी मराठा समाजाला आरक्षण देईल त्यांच्या पाठिशी आम्ही ठाम उभे राहू असंही दिलीप जगताप यांनी म्हटलं.