औरंगाबाद : पेट्रोल संपले तरीही पळणारी हायब्रीड बाइक शहरातील ३४ वर्षीय अभियंत्याने भंगारातून तयार केली. ही हायब्रीड बाइक पेट्रोलवर ४० ते ४५ किमी तर बॅटरीवरही २५ किलोमीटर चालू शकते. म्हणजे दैनंदिन कामासोबत सुरक्षितता दोन्हीच्या दृष्टीतून परवडणारी ही बाइक वेस्ट टू वेल्थ संकल्पनेतून अफरोज शेख मुश्ताक यांनी बनवली आहे. हेल्मेट घातलेले नसेल आणि दारू सेवन केलेले असेल तर ही बाइक सुरूच होत नाही.
एमसीव्हीसी ऑटोमोबाइलचे शिक्षण घेतल्यावर मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करून अफरोज शेख सध्या कूलरच्या एका कंपनीत काम करतात. त्यांनी काॅलेजमध्ये असताना १९९८ मध्ये मोपेड घेतली होती. त्या मोपेडला १५ वर्षे पूर्ण झाल्याने ती आता भंगारात जाणार म्हणून त्यांनी वेस्ट टू वेल्थ संकल्पनेतून हायब्रीड बाइकची संकल्पना साकारली. जुनी मोपेड आणि डी मोटार, बॅटरी आणि कंट्रोलर अशा तीन वस्तूंचा वापर करून २५ हजार रुपयांत त्यांनी हायब्रीड बाइक तयार केली. हेल्मेटविना आणि दारू पिऊन वाहन चालवल्याने अपघातांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे ही जीवितहानी टाळण्यासाठी अल्कोहोल डिटेक्टर सेन्सरचा वापर करून हेल्मेटही बनवले. हे हेल्मेट घातले नसेल किंवा दारू प्यायली असल्यास ही बाइक सुरूच होत नाही.
नितीन गडकरींसमोर सादरीकरणाची इच्छा
शहरातील लोकप्रतिनिधींच्या मदतीने केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर या बाइकच्या सादरीकरणाची इच्छा आहे. त्यासाठी मदत मिळावी, अशी अफरोज शेख यांची मागणी आहे. स्टार्टअप यात्रेतही या बाइकच्या सादरीकरणाने लक्ष वेधले होते.
स्टार्टअप सुरू करण्याचा मानस
दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यातच १५ ते २० वर्षांनतर या वाहनांच्या भंगारच्या विल्हेवाटीचीही समस्या आहेच. त्यात वेस्ट टू वेल्थ संकल्पनेतून तयार केलेली ही हायब्रीड बाइक समस्येचे समाधान ठरू शकते. हाच स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असल्याचे अफरोज शेख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.