एवढे दिवस महाविकास आघाडीचे सांगलीवरून अडकलेले जागावाटपाचे गुऱ्हाळ आज संपले. ठाकरे गट शिवसेना २१, काँग्रेस १७ आणि शरद पवार राष्ट्रवादी १० असे जागावाटप जाहीर करण्यात आले. असे असले तरी सांगलीत मविआला मोठा दगाफटका होण्याची शक्यता असून काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील नॉट रिचेबल झाले आहेत. तर समर्थकांनी उद्या मतदारसंघातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. यात पाटील लढण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटलांनी विशाल पाटलांना पुन्हा एकदा साद घातली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी उमेदवारी अगोदरच जाहीर केली होती. आज महाविकास आघाडीकडून माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे. सर्व महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते माझा प्रचार करतील. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासहित वरिष्ठ नेत्यांची सांगलीत सभा घेणार आहेत. येत्या दोन दिवसांत महाविकास आघाडीतील घटक पक्षांची भेट घेऊन प्रचाराचे नियोजन केले जाणार आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रहार पाटलांनी दिली आहे.
याचबरोबर विशाल पाटील यांच्या संभाव्य बंडखोरीवर बोलताना त्यांनी पूर्वी देखील मी विशाल पाटील यांना आवाहन केले होते की विशाल पाटील यांना जरी उमेदवारी जाहीर झाली तर मी त्यांचा प्रचार करीन. माझी उमेदवारी जाहीर झाली तर तुम्ही माझा प्रचार करा. त्याच पद्धतीने विशाल पाटील यांनी देखील मला विजय करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन चंद्रहार पाटलांनी केले आहे.