पुणे: राज्यातील महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक निकालांमध्ये जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का देत घवघवीत यश मिळवले आहे. तर दुसरीकडे पुणे, नागपूर या बालेकिल्ल्यांसह औरंगाबादमध्येही भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपला लक्ष्य केले जात आहे. मात्र आता भाजपकडून देखील महाविकास आघाडीला प्रत्युत्तर देताना आव्हान देण्यात आले आहे.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचे निकाल समोर येऊ लागले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपची हॅट्ट्रिकची संधी हुकली असून या ठिकाणी महाविकास आघाडीचे अरुण लाड यांनी जवळपास ४८ हजार मताधिक्याने भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव करत विजयश्री खेचून आणली आहे. तसेच नागपूरमध्ये संदीप जोशी यांच्यावर मात करून काँग्रेसचे अभिजीत वंजारी हे विजयी झाले आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतीश चव्हाण यांनी विजयी परंपरा कायम राखली आहे. याच धर्तीवर महाविकास आघाडीच्या प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार, अजित पवार, आणि जयंत पाटील,रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना जोरदार टोला लगावला होता. त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे.
पाटील म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रितपणे आमच्याशी लढत दिली. यामुळे या निकालांमध्ये काहीही धक्कादायक असे घडलेले नाही. हे होणारच होते. परंतू, तरीदेखील भाजपने महाविकास आघाडीला कडवी झुंज देत चांगली लढत दिली. निकालांमध्ये मुद्दा असा की शिवसेनेला काय मिळालं याचा त्यांनी विचार करायला हवा. त्यांची अमरावतीची जागा गेली. याउलट या निकालांमध्ये भाजपला निदान धुळे नंदुरबार मतदारसंघात फक्त विजय मिळविता आला. मात्र शिवसेनेचे काय ? शिवसेनेने अमरावतीची एकमेव जग देखील गमावली. पण या निवडणुकीत सर्वाधिक फायदा झाला तो राष्ट्रवादी काँग्रेसचा. त्यांनी पुणे, औरंगाबाद व अप्रत्यक्षरीत्या अमरावती शिक्षक मतदार संघात विजय प्राप्त केला. माझे या तिघांना पण थेट आव्हान आहे की, हिंमत असेल तर त्यांनी एकट्याने आमचा सामना करावा. मात्र त्या तीन पक्षांमध्ये हिंमत नसल्याचे स्पष्ट आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला होता खोचक टोला.. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीकडून त्यांचा पराभव होईल असा खोचक टोला राष्ट्रवादीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.