ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - मरिन ड्राइव्ह येथील ओपन जीमवरून ( खुली व्यायामशाळा) राजकीय आखाडा रंगलेला असतानाच 'हिंमत असेल तर ओपन जिमला हात लावून दाखवा' असे आव्हान शिवेसेनेने विरोधकांना दिले आहे.
या जिमविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला होता तर ही व्यायामशाळा न हटवल्यास आमच्या स्टाइलने करू असा इशारा काँग्रेसने दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने विरोधकांना सज्जड दम दिला आहे. 'हिंमत असल्यास ओपन जिमला हात लावून दाखवा' असे होर्डिंग सेनेने लावले असून 'याद राखा... अंगावर आलात तर शिंगावर घेऊ' असा इशाराही त्यात दिला आहे. तसेत या जिमच्या रक्षणाची जबाबदारी शिवसैनिकांनी स्वत:च्या शिरावर घेतली असून त्यासाठी आज सकाळी ते मरीन ड्राइव्ह येथील पोलिस जिमखान्याजवळील या जिम येथे जमणार आहेत.
अभिनेता दिनो मोरिया यांच्या संकल्पनेतून मुंबईत पाच ठिकाणी पदपथावर खुली व्यायामशाळा सुरू करण्यात येत आहे़. मात्र उद्घाटनाआधीच मरिन ड्राइव्ह येथील ही व्यायामशाळा सी विभाग कार्यालयाने उचलली़. नाचक्की करणाऱ्या या घटनेमुळे शिवसेनेने काही तासांतच पालिका प्रशासनावर दबाव आणून ही व्यायामशाळा पुन्हा जागेवर बसवून घेतली़. या व्यायामशाळेला पालिकेची पूर्वपरवानगी असल्याचे सांगण्यात येत आहे़. मात्र या व्यायामशाळेला परवानगी नसल्याचा दावा २०१३ मधील आयुक्तांच्या पत्राचा दाखला देत काँग्रेसने केला आहे़. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन ही व्यायामशाळा पदपथांवरून हटवा अन्यथा आम्हालाच कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला़ तर राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी पदपथावरील या अतिक्रमणाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे संकेत दिले होते.