राज्यात सध्या एकमेकांचे वस्त्रहरण करण्याचे राजकारण सुरु झाले आहे. एकमेकांचे फोटो, व्हिडीओ आदी काढले जाऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात दोन नेत्यांनी खासदारकीच्या तिकीटावरून वाद घातला होता. आता संजय राऊतांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा मकाऊच्या कॅसिनोतील खेळतानाचा फोटो पोस्ट करून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
राऊत यांनी बावनकुळे यांनी साडे तीन कोटी रुपयांचे पोकर खरेदी केल्याचा दावा केला आहे, तसेच त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती असे म्हटले आहे. तर भाजपाने बावनकुळे हे कुटुंबासोबत तिकडे गेले होते, ते जिथल्या हॉटेलात उतरलेले तिथेच जोडून कॅसिनो होता, असा स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
यातच राऊतांनी बावनकुळेंचे असे २७ फोटो आणि तीन व्हिडीओ असल्याचा दावाही केला आहे. यावर आता भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी आव्हान दिले आहे. खरे मर्द असाल तर बावनकुळेंचा एक फोटो, एक व्हिडीओ टाकून दाखवावा. महाराष्ट्राचा पोपट मिया सलीम संजय राऊत यांना आव्हान देतोय असे कंबोज यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचे २७ फोटो आणि 3 व्हिडीओ आहेत असे म्हणताय ना, मग एकतरी फोटो व्हिडीओ टाकून दाखवा, असे कंबोज यांनी म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांपासून तरुण फळीतील भाजपाचे नेते आदित्य ठाकरे यांचे काही व्हिडीओ आपल्याकडे असल्याचे दावे करत आहेत. आमदार नितेश राणे यांनी देखील विधानसभेत पेनड्राईव्हमध्ये पुरावे दिले आहेत. तसेच संजय राऊत कोणत्या हॉटेलमध्ये कोणत्या व्यक्तीसोबत राहतात, याचे देखील पुरावे आपल्याकडे असल्याचे दावे करत आहेत. मोहित कंबोज यांनी देखील आदित्य ठाकरेंबाबत अनेकदा फोटो, व्हिडीओंचे दावे केलेले आहेत. यामुळे येत्या काळात फोटो, व्हिडीओंचे राजकारण रंगू लागण्याचे चिन्ह दिसत आहे.