मालवण : बाळासाहेब असताना शिवसेनेत स्वाभिमान होता. आताच्या नेतृत्वाकडे तो आहे की नाही हे मला माहीत नाही. मात्र, जर स्वाभिमान असेल, तर त्यांनी सत्तेपासून दूर व्हायला हवे, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मालवण तारकर्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. ‘भाजप’चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई येथे केलेल्या वक्तव्याबाबत ते बोलत होते. शरद पवार यांनी शुक्रवारी एक दिवसाचा सिंधुदुर्ग दौरा केला. मालवण तारकर्ली येथे त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, सरचिटणीस अमित सामंत, युवकचे अध्यक्ष अबीद नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्षडॉ. विश्वास साठे, मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर उपस्थित होते. महाराष्ट्रात भाजपला एकहाती सत्ता मिळवता आली नाही याची भाजप अध्यक्ष अमित शहा यांना खंत वाटत आहे. मात्र, एकहाती सत्तेचे वक्तव्य शिवसेनेला इशाराच आहे. भाजप शिवसेनेला बरोबर घेऊन सत्तेत बसले असले, तरी शिवसेनेचा खेळ केला जात आहे. शिवसेनेतील हरवलेला स्वाभिमान जागृत झाला, तर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागतील, असेही पवार म्हणाले. सरकारकडून जनहिताचे निर्णय नाहीतचराज्याच्या अनेक भागात यावर्षी जुलै महिन्यातील सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे कोकणसह सर्वच भागातील जनता पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत राज्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाला वेगळे धोरण आखावे लागेल. आपण पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांना याबाबत पत्राद्वारे सविस्तर कळविले आहे. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थितीची माहिती दिली आहे. मात्र, अद्याप शेतकरी हिताचा एकही निर्णय झालेला नाही, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.खासदार, आमदार मच्छिमारांची भूमिका मांडतीलयेथील जनतेला भेडसावणाऱ्या पर्ससीन मासेमारी व जाचक ‘सीआरझेड’ कायदा याबाबत पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार प्रश्न मांडतील. तसेच संसदेत राष्ट्रवादीचे खासदार आणि आपण स्वत: आग्रही भूमिका घेऊ व जनता व शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यास शासनास भाग पाडू. येथील जनतेला न्याय देणे यालाच आमचे प्राधान्य राहील, असेही पवार म्हणाले.(वार्ताहर)एका वर्षातच घोटाळ््यांचा विक्रम केलाखोटी आश्वासने देऊन भाजप सत्तेत आली. एका वर्षातच 'अच्छे दिन' काय असतात, ते सर्वांना कळले. सत्तेचा गैरवापर कसा होतो ते काही महिन्यांतच पाहायला मिळाले. देशात राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये सरकारची लक्तरे दररोज बाहेर पडत आहेत. एका वर्षात घोटाळ्यांचा विक्रम करण्याची कामगिरी शासनकर्त्यांनी केली.
स्वाभिमान असेल तर सत्तेपासून दूर व्हा!
By admin | Published: July 10, 2015 10:43 PM