हिंमत असेल तर स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात – काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 04:24 PM2023-11-06T16:24:11+5:302023-11-06T16:24:43+5:30

ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नव्हते, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढाव्या लागल्या त्याला भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत असा आरोप पटोलेंनी केला.

If you have the guts, you should show it by holding elections to Corporations, Congress Nana patole Challenges to BJP | हिंमत असेल तर स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात – काँग्रेस

हिंमत असेल तर स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात – काँग्रेस

मुंबई - राज्यातील २ हजार ३२० ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आतापर्यंत ५८९ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे तर १३२ ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवत एकूण ७२१ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीने एकूण १३१२ ग्रामपंचायतीत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे. भाजपाने केलेले दावे साफ खोटे असून हिंमत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला दिले आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुक निकालाबद्दल भारतीय जनता पक्षाने केलेला दावा हा खोटा व हास्यास्पद आहे. मुळात या निवडणुका चिन्हावर लढल्या जात नाहीत, त्यांनी दिलेले आकडे हे खोटे आहेत, त्यांनी ग्रामपंचातींच्या नावासह यादी जाहीर करावी मग कळेल जनतेने कोणाच्या बाजूने निकाल दिला आहे. मागील वर्षी झालेल्या बाजार समिती निवडणुकीतही भाजपाने असाच खोटा दावा केला होता वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. राज्यातील बहुतांश बाजार समित्यांवर काँग्रेस व मित्रपक्षांचाच विजय झालेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही राज्यातील जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे पण ‘खोटे बोल पण रेटून बोल’ अशा पद्धतीने ते विजयाचा खोटा दावा करत आहेत. नागपूर जिल्ह्यातही भाजपाचा सुपडासाफ झालेला आहे, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील आतापर्यंत २३ ग्रामपंचयातीवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असून भाजपाच्या वाट्याला फक्त २ ग्रामपंचायती आल्या आहेत तरीही ते स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत असा टोला त्यांनी लगावला.

त्याचसोबत ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नव्हते, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढाव्या लागल्या त्याला भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. फडणवीस व भाजपामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. सत्तेवर आलो तर २४ तासात ओबीसी समाजाचे आरक्षण देण्याची वल्गना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पण दीड वर्षात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण दिले नाही याचे उत्तरही जनतेने भाजपाला दिले आहे. राज्यातील जनतेने भाजपाचा खोटारडा चेहरा उघडा पाडला आहे. महाराष्ट्रात सर्वच भागात काँग्रेसचा प्रभाव आहे असं नाना पटोलेंनी म्हटलं.

...मग घाबरता कशाला?

अजित पवार महायुतीत आल्याने फायदा झाल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, महायुतीला जर फायदा झाला असेल तर मग विधानसभा बरखास्त करुन निवडणुका घेण्याची हिंमत का दाखवत नाहीत. तिन तिघाडा आणि काम बिघाडी अशी त्यांची अवस्था आहे. चिन्हावरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास ते का घाबरता आहेत? असा सवाल पटोलेंनी विचारला.

Web Title: If you have the guts, you should show it by holding elections to Corporations, Congress Nana patole Challenges to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.