मुंबई :राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी समाधानी नाही, अशी टीका करतानाच राज्यावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. गरज भासली तर शेतक-यांसाठी राज्य सरकारने आणखी कर्ज काढावे. पण अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. राज्यातील सततची दुष्काळी स्थिती आणि राज्य सरकारने करायच्या उपाययोजना यासंदर्भात विरोधकांनी चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. सुरुवात करताना राणे म्हणाले की, राज्यावर गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटे ओढवत आहेत. परिणामी आर्थिक अडचणीतील शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. गेल्या एका वर्षात आत्महत्यांमध्ये सोळा टक्क्यांनी वाढल्याचे सरकार सांगत आहे. सरकारने कृषी क्षेत्रात शाश्वत उपाययोजना केल्या असत्या, दुष्काळग्रस्तांना पिण्याचे पाणी, पुरेसे अन्न-धान्य, शालेय विद्यार्थ्यांची फी माफी आणि शेतक-यांना वेळीच मदत दिली असती तर आत्महत्यांची संख्या घटली असती. सध्यस्थितीत राज्यात शेतकरी समाधानी नाही, असे सांगत राणे यांनी अच्छे दिनाच्या घोषणेची खिल्ली उडवली. विरोधकांनी सातत्याने शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. मात्र, मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यावधींचा खर्च, कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग, व्यापा-यांना सात हजार कोटींची एलबीटी माफी करणा-या सरकारला शेतक-यांबाबत कणव नाही. सत्तेत येण्याआधी केलेली आश्वासने कुठे गेली, असा सवाल राणे यांनी केला.दुष्काळी मराठवाड्यातून स्थलांतर वाढले दुष्काळी मराठवाड्यातून स्थलांतर वाढले आहे. हे महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला कलंक आहे, अशी टीका राणे यांनी केली. प्रगत राज्य म्हणून राज्याची ओळख आहे. संकटातील शेतक-यांना मदत करा. राज्यावर सध्या तीन लाख कोटींचे कर्ज आहे. गरज पडल्यास आणखी कर्ज काढा पण राज्यातील शेतक-यांना सक्षम करण्यासाठी मदत करा, अशी मागणी राणे यांनी केली.
वेळ पडल्यास आणखी कर्ज काढा, पण शेतकऱ्यांना मदत करा
By admin | Published: July 29, 2016 3:36 AM