मुंबई : राज्य सरकारने प्रस्तावित भाडे नियंत्रण कायदा परत घ्यावा अन्यथा आपण आमदारकीचा राजीनामा देऊ, असा इशारा भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांनी दिला आहे. भाडे नियंत्रण कायद्यास विरोध करण्यासाठी दक्षिण मुंबईत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लोढा म्हणाले की, भाडे नियंत्रण कायद्यातील प्रस्तावित बदलामुळे दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईतील इमारतींमध्ये राहणाऱ्या लाखो भाडेकरूंना फटका बसणार आहे. नवीन कायद्यामुळे सध्याच्या भाड्यात तब्बल दोनशे पट वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे लोक नाराज असून, सरकारने भाडेवाढीचा प्रस्ताव मागे घ्यावा.गिरगाव, गावदेवी, आॅपेरा हाउस, खेतवाडी, मलबार हिल, वाळकेश्वर, महालक्ष्मी, ताडदेवसह दक्षिण व मध्य मुंबईतील भाडेकरूंना प्रस्तावित भाडे नियंत्रण कायद्याचा फटका बसणार आहे. या वेळी मुंबई रीटेल ट्रेडर्स फेडरेशन, मासमा, आहार, आॅल इंडिया बिझनेस कौन्सिल, एलआयसी टेनेंट असोसिएशन आदी व्यापारी आणि रहिवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
...तर आमदारकी सोडेन!
By admin | Published: January 25, 2016 2:36 AM