मुंबई - विधान परिषदेच्या ५ जागांसाठी ३० जानेवारीला मतदान पार पडलं, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जनतेच्या मतांचा कल व मताधिक्य बघितले तर महाराष्ट्र किती मोठ्याप्रमाणावर महाविकास आघाडीच्या पाठीमागे एकसंघपणे उभा आहे हे चित्र यातून दिसून येते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळताना दिसत आहे आणि सर्व ठिकाणी महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळाला आहे. बरेच उमेदवार आघाडीवर आहेत. निकाल लागायला रात्री उशिर होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राऊंडवरच असे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला प्रतिसाद मिळाला आहे. त्यात अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोकण विभागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे असं त्यांनी सांगितले.
तर कोकणात बाळाराम पाटील यांच्यासारखा चांगला उमेदवार पराभूत झाला. त्याची कारणे जगजाहीर आहेत. प्रचंड धनशक्तीपुढे सरळमार्गी बाळाराम पाटील यांचा निभाव लागला नाही परंतु लोकांच्या मनात बाळाराम पाटीलच आहेत. याबद्दल माझ्या मनात शंका नाही असंही जयंत पाटील म्हणाले. पाच जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडी आज पुढे आहे हे फार मोठे असे यश आहे. सत्तारुढ पक्षाच्या विरोधात महाराष्ट्र आहे हे समोर आले आहे. मागच्या साडेतीन वर्षात महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेने सत्तेत असो अथवा नसो उचलून धरले आहे त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे जयंत पाटील यांनी आभार मानले.
सर्व्हे खरा ठरला!इंडिया टूडेचा जो सर्व्हे आला होता तो खरा आहे याची पुन्हा एकदा प्रचिती या निवडणूक निकालावरून आली आहे. ग्रामपंचायत, नगरपंचायतमध्ये आमची महाविकास आघाडी पुढे आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील सुशिक्षित मतदारांनीदेखील महाविकास आघाडीला कौल दिला आहे. महाराष्ट्रात धोका देण्याचे जे काम झाले ते महाराष्ट्राने मान्य केलेले नाही. महापुरुषांचा अपमान करण्याचे काम महाराष्ट्रात सातत्याने सत्तारुढ पक्षाकडून व मंत्री आणि राज्यपालांकडून झाला ते महाराष्ट्राने सहन केलेले नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यामागे महाराष्ट्र ठामपणाने उभा आहे हे यावरून सिद्ध झाले आहे असं जयंत पाटलांनी सांगितले.
नाशिकमध्ये भाजपा द्विधा मनस्थितीत नाशिकमध्ये भाजपला उमेदवार उभा करता आला नाही. उभा करायचा की नाही या द्विधा मनस्थितीत होते. तर दुसरीकडे कॉंग्रेसवतीने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली गेली होती. उमेदवारी भरताना थोडासा गोंधळ झाला. त्यानंतर सत्यजित तांबे हे उमेदवार म्हणून लोकांसमोर गेले त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्यात भाजपचा रोल राहिलेला नाही. महाविकास आघाडीच्या विचाराची लोकं महाराष्ट्रात दिसून आली आहेत असा टोला जयंत पाटलांनी भाजपाला लगावला.