तिसरी चूक झाल्यास मंत्रिपद जाईल; वादग्रस्त विधाने करणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 07:12 IST2025-04-10T07:12:02+5:302025-04-10T07:12:36+5:30
पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबाराला दांडी मारणे आणि पक्षाच्या मंगळवारी होणाऱ्या नियोजित बैठकीस उशिरा येण्याच्या मुद्द्यावरून पवार यांनी मंत्र्यांना झापल्याचे समजते.

तिसरी चूक झाल्यास मंत्रिपद जाईल; वादग्रस्त विधाने करणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा
NCP Ajit Pawar : संवेदनशील विषयावर वादग्रस्त वक्तव्ये करून पक्षाला अडचणीत आणणाऱ्या कृषिमंत्री कोकाटेंवर अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. पवार यांनी मंगळवारी देवगिरी निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत कोकाटे यांच्यासह मंत्र्यांना "एक-दोनदा चूक झाली तर समजून घेऊ, तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही, तर मंत्रिपद बदलू" असा इशारा दिल्याचे समजते.
एकीकडे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांवर आरोप झाल्याने पक्षाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. त्या आरोपांतून पक्ष काहीसा सावरत असताना दुसरीकडे मंत्री कोकाटे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त विधाने केली जात असल्याने पक्ष अडचणीत येत आहे. त्यासोबतच पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबाराला दांडी मारणे आणि पक्षाच्या मंगळवारी होणाऱ्या नियोजित बैठकीस उशिरा येण्याच्या मुद्द्यावरून पवार यांनी मंत्र्यांना झापल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना उद्देशून 'पीकविम्याचे पैसे मिळाले की साखरपुडा, लग्न उरकता,' असे वक्तव्य केले होते.
कोकाटेनी मुख्यमंत्र्यांची नाराजी ओढवून घेतली
त्यापूर्वी अमरावती येथे पीकविमा योजनेवरून 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही,' असे वक्तव्य करून त्यांनी वाद निर्माण केला होता.
शेष कार्यकारी अधिकारी निवडीबाबत वक्तव्य करून कोकोटेनी मुख्यमंत्र्यांची नाराजी ओढवून घेतली होती. त्यातच शासकीय कोट्यातील सदनिका लाटल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झाल्याने कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आली होती. या सर्व प्रकरणामुळे कोकाटे यांच्यासह राष्ट्रवादी पक्षावरही टीका होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पवार यांनी कोकाटे यांना यापुढे वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणल्यास मंत्रिपद बदलण्याचा इशारा दिल्याचे समजते.