मुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, फॉर्म भरून घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देणे किंवा फॉर्म भरून देण्याचे निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर, तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘लाडकी बहीण’साठी तलाठी भाऊ घेतो ३० रुपये‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रांसाठी पैशाची मागणी केल्याच्या तक्रारी व कामकाजातील त्रुटींमुळे मोठी उमरी येथील तलाठी राजेश शेळके यांना सेवेतून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी बुधवारी हा आदेश जारी केला. तलाठी पैसे घेत असल्याचे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना नोटीस मिळाली. दप्तराची तपासणी करण्यात आली. तलाठ्यांनी उत्पन्न दाखल्यासाठी ३० रुपयांची मागणी केली, असा जबाब नागरिकांनी दिला. दप्तर तपासणीत कार्यालयीन कामकाजात अनेक त्रुटी आढळून आल्या.
माता-भगिनींना माहेरचा आहेरही योजना म्हणजे माता-भगिनींना माहेरचा आहेर आहे. नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने चोख नियोजन करावे, लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सक्त सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
योजनेला जोडले खासदाराचे नाव लाडकी बहीण योजनेच्या नावात बदल करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी पद्धतीने पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी पोंभूर्णा (जि. चंद्रपूर) येथील धम्मा निमगडे याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधितावर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. संबंधिताने योजनेचा ‘प्रतिभा धानोरकर लाडकी बहीण योजना’ असा उल्लेख करून संदेश व्हॉट्सॲपद्वारे प्रसारित केला.