मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याकरिता निवडणूक ड्युटीवरील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक दिवस अगोदर मतदान केंद्रावर साहित्यासह हजर व्हावे लागते. तेथेच त्यांना रात्र काढावी लागते. अशावेळी मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांनी पार्टी झोडल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई उपनगरात एकूण ७६ लाख ८६ हजार ०९८ मतदार आहेत. त्यापैकी ३५ लाख ८३ हजार ८०३ महिला, ४१ लाख एक हजार ४५७ पुरुष, तर ८३८ तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदारांना सात हजार ५७९ केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यापैकी ५५३ गृहनिर्माण सोसायटीमध्ये, तर २१९ मतदान केंद्रे झोपडपट्टीत आहेत. एक हजार ३०२ मतदान केंद्रे ही तात्पुरती उभारण्यात, तर सहा हजार २७७ कायम मतदान केंद्रे आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्हीची आणि निवडणूक अधिकाऱ्यांसह विशेष पथकाची करडी नजर असणार आहे. मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे. जर कोणी मद्यपान केल्याचे आढळल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येते. तसेच संबंधिताविरुद्ध शिस्तभंगाचा प्रस्ताव पाठवला जातो.निवडणूक निर्णय अधिकारी
या दिवशी ड्राय डे
१८ नोव्हेंबर रोजी प्रचार थंडावणार आहे. त्यामुळे १८ ते २० नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत ड्राय डे असणार आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी मतमोजणीच्या दिवशी २३ नोव्हेंबरलाही ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे.