कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात चुडीदार ड्रेस घालणाऱ्या महिलांना मनाई असणार आहे. साडी नेसून देवीच्या दर्शनाला जावे, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. त्यामुळे मंदिर प्रवेशाचा गुंता सुटल्यावर आता ड्रेसकोडवरून नवा वाद सुरू झाला आहे. तुम्ही चुडीदार ड्रेस घालून आल्यास श्रीपूजक प्रवेश करू देणार नाहीत. तुम्ही साडी नेसून देवीच्या दर्शनाला जावे, अशी सूचना जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना केली. त्यांनी त्यास नकार दिला असून आपण चुडीदार घालूनच मंदिरात जाणार असल्याचे जाहीर केले आहे. अंबाबाई मंदिरात पाचशे महिलांसह आपण गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेणार असल्याचे श्रीमती देसाई यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. तोपर्यंत स्थानिक महिलांनी सोमवारीच मंदिर प्रवेश करून त्यांच्या आंदोलनातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु देसाई देवीचे दर्शन घेण्यावर ठाम होत्या. मंगळवारी देवीच्या दर्शनाचा मुद्दा त्यांनी कोणता पेहराव करावा या दिशेने गेला. देसाई बुधवारी येणार असल्याने पोलीस निरीक्षक देशमुख यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळेचे संभाषण देसाई यांनी ध्वनिमुद्रित केले व ते सोशल मीडियावर शेअर केले. देसाई म्हणाल्या, चुडीदार घालून दर्शनासाठी येऊ नये असे कशात लिहिले आहे. मी कधीच साडी वापरत नाही. मी कोल्हापूरची आहे. त्यामुळे मी चुडीदार घालूनच येणार आहे. (प्रतिनिधी)
चुडीदार घातल्यास अंबाबाई मंदिरात प्रवेशास मनाई!
By admin | Published: April 13, 2016 2:01 AM