ऑनलाइन लोकमत
बेळगाव, दि. 22 - सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी करणा-या कर्नाटक सरकारने टोकाचं पाऊल उचललं आहे. "जय महाराष्ट्र" ही घोषणा दिल्यास घोषणा देणा-या लोकप्रतिनिधींचं पदच रद्द करण्याचा इशारा कर्नाटक सरकारने दिला आहे. लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र बोलल्यास किंवा कर्नाटकविरोधात घोषणा दिल्यास पद रद्द करण्याचा इशारा नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी दिला आहे.
लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रमात किंवा सभागृहात जय महाराष्ट्र किंवा कर्नाटकविरोधात घोषणा दिल्यास पद रद्द करण्याचा कायदा आणण्याची तयारी सुरू आहे, आगामी अधिवेशनात असं घडल्यास त्या लोकप्रतिनिधींचं पद रद्द केलं जाईल अशी माहिती बेळगाव दौ-यावर आलेले रोशन बेग यांनी दिली. बेळगाव महापालिका सभागृहात याबाबत मंगळवारी बैठक घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते दोन दिवसांच्या बेळगाव दौ-यावर आहेत.
सीमाभागातील मराठी भाषिकांचा आवाज दाबण्यासाठी कर्नाटक सरकारचा हा प्रय़त्न असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे एकीकडे अल्पसंख्यांक घटनात्मक अधिकार देण्यास टाळाटाळ सुरु असताना, एकीकरण समितीच्या लोकप्रतिनिधींची अशीही गळचेपी होणार आहे. दरम्यान कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचा परिणाम सीमाभागावर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा तालिबानी निर्णय असल्याचं म्हटलं आहे. याबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दखल द्यावी असं त्या म्हणाल्या.