मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षण द्यायचं आहे, मात्र देवेंद्र फडणवीस ते देऊ देत नाहीत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर मराठा आरक्षणामध्ये जर मी अडथळा ठरत असेन तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असं प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता मनोज जरांगे यांनीही आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा आरक्षण रोखलं, असा दावा केला आहे.
मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही तुम्हाला विरोधक मानलेलं नाही. हे तुम्ही का समजून घेत नाही. तुमच्यावर अशी भाषा बोलण्याची वेळ का आली? शेवटी तुम्ही या राज्यातील कर्ते आहात. आता तुम्ही इतक्या हताशपणे राजीनामा देईन, असं म्हणायला लागलात. मराठ्यांविरोधात गेल्याचा पश्चाताप तुम्हाला झाला आहे. तुम्ही राजीनामा देईन म्हणताय, तर माझी तुम्हाला सरळ सरळ विनंती आहे. मी कुठलंही आढवेढं घेत नाही, राजकीय भाषा बोलत नाही. तुम्ही राज्याचे कर्ते आहात. तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलंय, ते तुम्ही द्या ना. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही रोखलीय, हे तुम्ही नाकारून चालणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
त्याआधी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सगळं काही द्यायचे आहे. मग ते सगेसोयरे असेल, मराठा आरक्षण असेल मात्र देवेंद्र फडणवीस हे त्यांना करू देत नाही असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला होता. त्यानंतर राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारावर काम करत असतात. एकनाथ शिंदे आणि मी एकत्रित काम करतो. शिंदेंना पूर्ण पाठबळ आणि पाठिंबा माझा आहे. त्यामुळे जरांगेंनी केलेल्या आरोपावर एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं. मी मराठा आरक्षणाच्या मध्ये येतोय असं मुख्यमंत्री म्हणाले तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईन, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते.