पुणे : एकदा गुन्हा दाखल झाल्यास पोलिसांना मला अटक करावी लागेल़, तुम्हाला जर पैसे हवे असेल, तर तुम्ही मला जिवंत बाहेर ठेवले पाहिजे़ तुम्ही जर मला तुरुंगात पाठविले तर तुमचे पैसे मी का देऊ, असा सवाल प्रसिद्ध उद्योगपती डी़ एस़ कुलकर्णी यांनी सोमवारी गुंतवणुकदारांना विचारला़
गुंतवणुकदारांचे पैसे परत न केल्याबद्दल डी़ एस़ के उद्योगसमुहाविरोधात दिलेल्या तक्रारीचा तपास पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे़यासंदर्भात पोलिसांनी डीएसके यांना चौकशीसाठी यापूर्वी दोन वेळा बोलविण्यात आले होते़ त्यावेळी त्यांनी गुंतवणुकदारांबरोबर चर्चा करुन पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते़ परंतु, काही जणांचे पैसे न दिल्याने त्यांनी फिर्याद नोंदविण्याची तयारी केली होती़ सोमवारी काही गुंतवणुकदार व डी़ एस़ कुलकर्णी यांना पोलीस आयुक्तालयात बोलविण्यात आले होते़ त्यावेळी गुंतवणुकदारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
यावेळी बोलताना डी़ एस़ कुलकर्णी यांनी सांगितले, की पैसे परत न केल्यास अटक करु असे पोलिसांनी सांगितले आहे़ उद्यापासून टप्प्याटप्प्याने व्याजाचे पैसे परत करण्यास सुरुवात करणार आहे़ आपल्याकडे ४ कोटी १८ लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट आहे़ त्याचा पुरावा मी आपल्याकडे दिला आहे़ कालपर्यंत दीड हजार लोकांना व्याज देऊन झाले आहे़
यावेळी गुंतवणुकदारांनी आमचे गेल्या वर्षीपासूनचे पैसे मिळाले नसल्याचे सांगितले़ तेव्हा ते म्हणाले, मार्चअखेरपर्यंत ज्यांचे पैसे राहिले आहेत़ त्यांना उद्यापासून व्याज देण्यास सुरुवात करणार असून महिन्याअखेरपर्यंत सर्वांना पैसे दिले जातील़ कंपनी तोट्यात आहे़ माझ्यावर विश्वास नसेल तर, तुम्ही एखादा चार्टड अकाऊंटंट नेमून त्याच्याकडून खात्री करुन घ्या़ कंपनीचा ड्रीम सिटीचा सौदा चालू आहे़ अमेरिकेतून लोक आले आहेत़ त्यांच्याबरोबर बोलणी सुरु आहेत़ आम्हाला वेळ द्या़ असे त्यांनी सांगितले़. त्यानंतर गुंतवणुकदारांनी फिर्याद न देता काही दिवस वाट पाहण्याचा निर्णय घेतला.
पाहा व्हिडीओ-