कल्याण - काहींनी सुरक्षा हवी यासाठी खोटा बनाव रचला. काळू-बाळूची जोडी तसे हे आहेत. सुरक्षा पाहिजे होती तर मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगायचे. एक पुढे आणि एक मागे पोलिसांची गाडी दिली असती. पण या गोष्टी करायची गरजच काय? एवढे तुम्ही बोलता मग घाबरता कशाला? माझ्यावर आरोप लावले मी सुपारी दिलाय. त्यावेळीही तोंडावर आपटले आणि आताही आपटले अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.
कल्याणमध्ये घेतलेल्या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. श्रीकांत शिंदे म्हणाले की, राम मंदिर बांधणे, कलम ३७० हटवणे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. हे स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केले त्यांच्यासोबत आपण गेलो तर चूक काय? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सरकारला शिव्या देण्याचे काम करतायेत. झोपेतही हे गद्दार गद्दार बोलत असतील. एकाने थुंकण्यापर्यंत मजल गेली. ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. राज्याची संस्कृती खराब करण्याचं काम या लोकांनी केले असं त्यांनी सांगितले.
तसेच एकनाथ शिंदे यांनी सगळं पणाला लावलेले होते. हे सरकार बनेल त्यांना माहिती नव्हते. जिथे सरकार असते तिथे लोक जातात पण इथं सरकार असून मंत्री, आमदार, खासदार बाहेर जातायेत हे पहिल्यांदा घडलंय. एकनाथ शिंदे यांना अनेक गोष्टी पटल्या नाहीत. याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभिकरण केले आधाच्या सरकारने केले. परंतु आपले सरकार येताच अफझलखानच्या कबरीवरील अनाधिकृत बांधकाम पाडले. बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट म्हणू शकत नव्हते. वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे असा आरोपही श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
दरम्यान, आनंद दिघेंसोबत काम करणारे लोक आहेत. एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे लोक आमच्यासोबत आले. स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता पीपीई किट घालून कोरोना काळात बाहेर पडले. युतीत आपण काही बोलल्याने वितुष्ट येईल असं करू नका. संयम बाळगावा. आगामी सर्व निवडणुका शिवसेना-भाजपा युती म्हणून लढणार आहोत. लोकांपर्यंत आपल्याला पोहचायचे आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवावा. १९ जून रोजी शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मोठ्या संख्येने हजर राहा असं आवाहन श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.