वडगाव मावळ : गेल्या निवडणुकीत उपसभापतिपदाचा दिलेला शब्द भाजपाने पाळला नाही, असा दावा शिवसेनेने केला आहे. भाजपा आमचा असाच उपयोग करून घेणार असेल, तर आगामी पंचायत समिती निवडणुकीत वेगळा विचार करू, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेनेतील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.मार्च २०१२ मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपा-शिवेसेनेची युती होती. भाजपाचे सहा, राष्ट्रवादीचे दोन, अपक्ष आणि शिवसेनेचा एक असे दहा सदस्य निवडून आले होते. भाजपाला बहुमत मिळाले. परंतु सभापतिपद सर्वसाधारण जागेसाठी राखीव असल्यामुळे पहिले सभापतिपद देण्यावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद होता. ज्ञानेश्वर दळवी यांना पहिले सभापतिपद देण्याचे जाहीर झाल्यानंतर भाजपातील काही नाराज सदस्य आणि शिवसेना व अपक्ष सदस्य एकत्र येऊन सभापतिपदासाठी दावेदारी करू लागले. हे पाहून भाजपातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या वरसोली गणातून निवडून आलेल्या आशा देशमुख यांना घरी जाऊन तुम्हाला चार वर्षांनंतर उपसभापतिपद देऊ असे आश्वासन दिले. परंतु आता चार वर्षे उलटूनही भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे शिवसैनिक नाराज असून, भाजपा आमचा असाच उपयोग करून घेत असेल, तर आगामी पंचायत समिती निवडणुकीत वेगळा विचार करू, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांनी दिला आहे. या संदर्भात खांडभोर यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहारही केला होता. त्यालाही उत्तर मिळाले नाही. दरम्यान, शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे यांनीही पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबरोबर चर्चा केली होती. परंतु भाजपा नेत्यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत मावळात राजकीय वर्तुळात वेगळे चित्र पाहण्यास मिळण्याची मोठी शक्यता आहे. (वार्ताहर)>२०१२ च्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपा-शिवसेना अशी कोणतीही युती नव्हती. आम्ही दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या होत्या. त्यामध्ये आम्हाला बहुमत मिळाले होते. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला शब्द देण्याचा प्रश्नच येत नाही. तरीदेखील त्यांनी बसून चर्चा करावी. चर्चा केल्यास हादेखील प्रश्न मार्गी लावू. आशा देशमुख भाजपामध्ये प्रवेश करणार होत्या. त्यांनी प्रवेश केला असता तर पक्षाने या आधीच त्यांचा विचार केला असता, असे भाजपाचे प्रभारी भास्कर म्हाळस्कर यांनी सांगितले.
...तर निवडणुकीत वेगळा विचार करू!
By admin | Published: June 13, 2016 2:15 AM