मुंबई - सूर्य दिवसेंदिवस आग ओकत असून उकाड्याने शरीराची काहिली होत असतानाच हातावर पोट असलेले अनेक जण तळपत्या उन्हात हिंडत आपल्याकडील वस्तू विकताना दिसतात. वस्तू विकल्या नाहीत तर पैसे मिळणार नाहीत आणि पैसे मिळाले नाहीत तर पोटाची खळगी भरणार नाही अशी स्थिती असल्यामुळे उन्हात पायपीट करण्याशिवाय अनेकांकडे पर्याय नाही. उन्हाचे चटके घेतल्याशिवाय पोटाची खळगी भरत नाही असे अनेकांनी सांगितले.
३७ अंश पारा गाठला एप्रिलमध्ये मुंबईतील उन्हाने ३७ अंशांचा पारा गाठला होता. या उकाड्याने सर्वसामान्य हैराण झाले असतानाच रस्त्यावर राहणारे, नाका कामगार पैसे कमाविण्यासाठी रस्त्यावर फिरतात. १०० ते २०० रुपये कमविण्यासाठी मुंबईतील ट्रॅफिक सिग्नल, टोल नाके, चौकात विविध वस्तू विकतात. वस्तू विकणाऱ्यांमध्ये वृद्ध माणसे, महिला यांचा समावेश असल्याने त्यांना उकाड्याचा भयंकर त्रास सहन करावा लागतो.
पदरात लहान मुले आणि म्हातारी माणसेरस्त्यावर तसेच ट्रॅफिक सिग्नलवर गुलाबाची फुले, खेळणी विकणाऱ्या महिलांच्या पदरात लहान मुले असल्याने त्यांना उन्हात काबाडकष्ट करून वस्तू विकाव्याच लागतात तसेच याच सिग्नलवर, टोल नाक्यांवर चणे, शेंगदाणे विकणाऱ्या पुरुषांची संख्याही कमी नाही. या कष्टकऱ्यांच्या घरात म्हातारे आईवडील असल्याचे एका चणे विक्रेत्याने सांगितले.
१५० ते २०० रुपये कमाईटोल नाका, ट्रॅफिक सिग्नलवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्टकरी महिला, पुरुषांकडून लहान मुलांची खेळणी, फुले, हार, चणे, शेंगदाणे विकले जातात. तेव्हा कुठे १५० ते २०० रुपये कमाई होते. कधी कधी तर ७० ते ८० रुपयांवरच समाधान मानावे लागते, असे एका फूल विक्रेत्या महिलेने सांगितले.
महागाई वाढतेय दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने जगणेही मुश्कील झाले आहे. रोजच्या कमाईतून महागाईला तोंड देणे कठीण जात आहे. घरात खाणारी माणसे सहा आणि कमावते हात दोन असल्याने वस्तू विक्रीतून पुरेसे पैसे साठत नसल्याची खंत फुले विक्रेत्या महिलेने व्यक्त केली.