ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 09 - शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांकडून आरोप - प्रत्यारोप केले जात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अंधेरीमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग रेनकोट घालून आंघोळ तरी करतात. मात्र तुम्ही तर देशाला बिनपाण्याची आंघोळ घातली, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर केला. तसेच, नरेंद्र मोदींनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय सुद्धा चुकीचा होता, असेही ते म्हणाले.
युती तोडली नसती तर पप्पू कलानीसोबत माझा फोटो झळकला असता. भाजपाने सत्तेसाठी कुणाशीही हातमिळवणी केली आहे. मुंबईला बदनाम करेल त्याच्या विरोधात शिवसेना सतत उभी राहीली आहे आणि यापुढेही राहील. शिवरायांच्या नावाने खंडणी मागणारी अवलाद आमची नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्रातील ६५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, असे त्यांच्याच पक्षातील नेते गिरीश बापट बोलले. सगळे कसे पारदर्शक, गिरीश बापट खरं बोलून गेले, असाही टोला भाजपाला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.