ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 3- शेतकरी कर्जमाफीसाठी मंत्र्यांचे राजीनामे देण्याची वल्गना करणारी शिवसेना आता सरकारबाहेर पडण्याऐवजी खांदेपालट का करते आहे? शेतक-यांचा विश्वासघात करणा-या या घुमजावासाठी शिवसेनेला नेमका काय मलिदा मिळाला? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
संघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी आज पंढरपूर आणि इंदापूर येथील जाहीर सभांमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी भाजप आणि शिवसेनेच्या सरकारवर जोरदार तोफ डागली. शिवसेनेवर हल्लाबोल करताना विखे पाटील म्हणाले की, शिवसेनेने आजवर शिवरायांच्या नावावर राजकारण केले. आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी आजच्या आज शिवरायांना खरी आदरांजली वाहण्यासाठी सरकारमधून बाहेर पडावे आणि विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंना केले.
शेतक-यांबाबत भाजपच्या दुटप्पी धोरणांचा समाचार घेताना ते म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षाने अनेक आश्वासने दिली. परंतु सरकारमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पक्ष आपली आश्वासने पाळायला तयार नाही. केवळ इव्हेंट करुन वेळकाढूपणाचे धोरण स्विकारले गेले आहे. या सरकारला शेतक-यांची अजिबात कणव नसून त्यामुळेच कर्जमाफीसाठी टाळाटाळ सुरु आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांची संयुक्त संघर्ष यात्रा हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. पुढील टप्प्यात हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. वेळ पडल्यास संपूर्ण राज्यभरातील शेतकरी एकाच दिवशी रस्त्यावर उतरुन सरकारला आपली ताकद दाखवून देईल, असेही सूतोवाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. याप्रसंगी मंचावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आसीम आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आ. प्रा. जोगेंद्र कवाडे आदी उपस्थित होते.
दरम्यान संघर्ष यात्रेत सहभागी झालेल्या सर्व नेत्यांनी आज सकाळी पंढरपूर येथे विठ्ठल रुखमाईचे दर्शन घेऊन शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारला सद्बुद्धी घालण्याचे साकडे घातले.