- योगेश पांडे नागपूर - सभापती पदाची निवडणूक एका दिवसावर आली असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांची चांगलीच खरडपट्टी काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर राजकारण का करता, असा सवाल उपस्थित करत पराभवाचे शल्य लपवायचे असेल तर बाहेर आंदोलन करा, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. एरवी संयमाने स्थिती हाताळणाऱ्या डॉ. गोऱ्हे यांचा हा पवित्रा पाहून सभागृहातील इतर सदस्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत मुद्दा उपस्थित केला. मात्र, संबंधित घटना ही संसदेत झाली असून, विधानपरिषदेच्या सभागृहाशी त्याचा काहीही संबंध नाही. नियमानुसार एका सभागृहातील घटनेची चर्चा दुसऱ्या सभागृहात होत नाही या नियमावर उपसभापतींनी बोट ठेवले. यावरून विरोधक आक्रमक झाले. दानवे, अनिल परब यांच्यासह विरोधकांनी या मुद्यावर चर्चेचा आग्रह धरला. मात्र, उपसभापतींनी बोलण्याची परवानगी नाकारली व विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. यावर डॉ. नीलम गोऱ्हे संतापल्या.
बाबासाहेबांबाबत सरकार व सभागृहातील प्रत्येक सदस्याला आदर आहे. कार्यक्रम पत्रिका ठरवत असताना विचारले होते तेव्हा कुणी बोलत नाही व ज्या गोष्टींवर चर्चा होऊ शकत नाही त्यावर वाद घालता. तुम्ही अभ्यासू सदस्य असून सर्व नियम जाणता. सकाळी आल्यापासून नियम विचारता. पराभवाचे शल्य लपवायचे असेल तर बाहेर जाऊन आंदोलन करा. याला राजकारण म्हणत नाहीत. सभागृहात बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर करणे मान्य नाही. बाबासाहेबांसाठी सभागृह बंद केले असा चुकीचा संदेश तुम्हाला बाहेर द्यायचा आहे अशा शब्दांत उपसभापतींनी विरोधकांना सुनावले. गोंधळ सुरूच असताना त्यांनी पुढील कामाला सुरुवात केली. यामुळे विरोधकांनी सभात्याग करून निषेध नोंदविला.
बाबासाहेबांच्या नावावर राजकारण का करता?बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा मुद्दा मांडला होता व आता पंतप्रधान समान नागरी कायद्याचा उल्लेख करत आहेत. बाबासाहेबांमुळे अनेक कुप्रथा गेल्या. त्यांच्यामुळेच आम्ही सभागृहात आहोत. मात्र, विरोधक चुकीच्या गोष्टी करून जनता व सभागृहाची दिशाभूल करत आहेत. बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करणे चुकीचे आहे. लोकांच्या भावनांवर तुम्ही तेल ओतू नका. आम्ही नामांतराच्या आंदोलनात तुरुंगात गेलो होते. तुमच्यापैकी कुणीही आत गेले नव्हते. बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर करू नका, या शब्दांत उपसभापतींनी कान टोचले.
रेकॉर्डवर निषेध न येऊ देण्याचा उपसभापतींचा प्रयत्न : दानवेगृहमंत्र्यांचे उद्गार हे संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान करणारे आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा मुद्दा राज्यातील सभागृहात उपस्थित केला जातो, मग गृहमंत्री यांच्या उद्गाराचा मुद्दा का उपस्थित केला जात नाही असा सवाल दानवे यांनी केला. सभागृहात आम्ही निषेध व्यक्त केला असता ते रेकॉर्डवर यावे यासाठीच उपसभापतींनी वेगळी भूमिका घेतल्याचा दावा दानवे यांनी केला.