नाशिक : शिवसैनिकांना डिवचण्याचे काम काही जण करीत आहेत. शिवसेना कोणाच्या वाटेला जात नाही. शिवसेनेच्या वाटेत याल तर आडवे केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे नाव न घेता दिला.दोन दिवसांपूर्वीच वेगळ्या मराठवाड्याविषयी वक्तव्य करणाऱ्या भाजपा महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांची सभा शिवसैनिकांनी उधळून लावली होती. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. याची गंभीर दखल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतली असून, शुक्रवारी त्यांनी शिंदे यांना नाशिकला पाठवून शिवसैनिकांची भेट घेण्यास आणि त्यांना आधार देण्यास सांगितले होते. शिवसेना कार्यालयात एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले.शिंदे म्हणाले, अखंड महाराष्ट्र ही शिवसेनेची आधीपासूनची भूमिका आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा कोणी प्रयत्न केला तर सत्तेत असो वा नसो, शिवसेना रस्त्यावर उतरते. त्यानुसारच परवाचे आंदोलन झाले. जे-जे महाराष्ट्र मोडण्याची भाषा करतील, त्यांच्या विरोधात कायमच शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. श्रीहरी अणे यांचे भाष्य असेच अखंड महाराष्ट्राच्या संकल्पनेला छेद देणारे असल्याने त्याविरोधात सेनेने भूमिका घेतली. अणेंचा राजीनामा हा शिवसेनेच्या आंदोलनाचा विजय आहे. अखंड महाराष्ट्र आणि जनतेच्या समस्यांवर शिवसेना नेहमीच रस्त्यावर उतरली आहे. दाखल गुन्ह्यांना शिवसेना घाबरत नाही. पोलीस पक्षपातीपणा करून शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करत आहेत. याप्रसंगी राज्यमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी, खासदार हेमंत गोडसे,आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाऊलाल तांबडे, महानगर प्रमुख अजय बोरस्ते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वाटेत याल तर आडवे करू
By admin | Published: March 26, 2016 1:44 AM